पिंपरीत मुलांचे शिक्षण अंधारात; एच. ए. शाळेची २१ दिवसांपासून वीज खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 06:06 PM2023-06-20T18:06:11+5:302023-06-20T18:06:47+5:30
शाळेचे व्यवस्थापन हस्तांतरण करण्यासाठीचा डाव एच. ए कंपनीचा असल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचा शाळेचा आरोप
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यान्वये शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामात अडथळा निर्माण करणे गुन्हा आहे. मात्र, येथील एच कंपनी कर्मचारी वसाहतीतील एच. ए. शाळेतील वीजपुरवठा गेल्या २१ दिवसांपासून खंडित झाला आहे. त्यामुळे गुरुवारपासून शाळा सुरू झाली असली तरी सुमारे तीन हजार मुलांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेचे व्यवस्थापन हस्तांतरण करण्यासाठीचा डाव कंपनी व्यवस्थापनाचा असल्याने वीजपुरवठा खंडित केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे. तर वीज वायरची चोरी झाल्यानंतर महावितरणकडे आणि पोलिसांकडे तक्रार केली आहे, तातडीने दुरुस्ती करून वीज सुरळीत केली जाईल, असा दावा कंपनी व्यवस्थापनाकडून केला आहे.
पुणे-मुंबई महामार्गावर एच. ए. कंपनी आहे. महामार्गाच्या एका बाजूला कंपनी तर दुसऱ्या बाजूला कर्मचारी वसाहत आहे. तिथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एच. ए. स्कूल १९६६ पासून सुरू आहे. कंपनीने ही जागा ९८ वर्षांच्या भाडेपट्ट्याने दिली आहे. दरम्यान २१ जानेवारी २०२१ पासून शाळेचे व्यवस्थापन हस्तांतरण करण्यासाठी टेंडर शासनाने ठरवून दिलेले कोणतेही नियम न पाळता प्रसिद्ध केले. त्यामुळे याबाबत शाळा व्यवस्थापनाने दावा दाखल केला आहे. त्यासोबतच २० सप्टेबर २०२२ ला कंपनीने मिळकतीतून बेदखल करण्यासाठी नोटीस बजावली आहे. कंपनी आणि शाळा व्यवस्थापन असा संघर्ष सुरू झाला आहे. तर शाळेने पोलिसात तक्रार दिली आहे.
२१ दिवस वीज खंडित
एचए कामगार वसाहत आणि शाळेच्या परिसरातील वीज २८ मे पासून वीज खंडित झाली आहे. विजेच्या तारांची चोरी झाल्याने डीपी जळाला होता. त्यानंतर काही काळ ३१ मे ला वीज सुरू झाली. त्यानंतर मात्र, शाळेच्या आवारातील वीज अजूनही सुरू केलेली नाही. त्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला आहे.
काय झाला परिणाम
वर्गामध्ये वीज नाही, स्वच्छतागृहात वीज नाही. फॅन वातानुकूलित यंत्रणा बंद, पाणी शुद्धीकरण यंत्रणा बंद, शाळा परिपाठ, सूचना नवीन कॅटलॉग काम ठप्प. वीज नसल्याने नवीन प्रवेशाचे काम ठप्प, संगणक यंत्रणा बंद, एसएससी बोर्ड आॅनलाइन रिपीटर अर्ज दाखल करणे बंद, वेतनबिल, पीएफ परतावा कामे ठप्प, शाळा सोडून जाणाºयांचे दाखले बंद झाले आहे.
''शाळेबाबत कायदेशीर लढा सुरू असताना जाणीवपूर्वक शाळेचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गुरूवारपासून शाळा सुरू झाली. मुलांना अंधारात शिक्षण घ्यावे लागत आहे. तसेच कामात प्रचंड अडथळे निर्माण झाले आहेत. याबाबत शिक्षणमंत्र्यांना निवेदन दिले आहे. पोलिसांत तक्रारही दिली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. -एकनाथ बुरसे, मु ख्याध्यापक''
''एचए वसाहतीतील वीजेच्या तारांची चोरी झाली होती. तसेच डीपीही जळाला होता. त्याबाबत महावितरणकडे तक्रार केली होती. वीज तारा चोरून नेण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. पोलिसांतही तक्रार दिली आहे. त्यानंतर दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. याबाबत पाठपुरावा सुरू आहे. तातडीने वीज पुरवठा सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. -अनुज सिंग, एच कंपनी''