शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक लाच घेताना अडकले जाळ्यात
By admin | Published: March 21, 2017 07:15 PM2017-03-21T19:15:37+5:302017-03-21T19:15:37+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी
Next
> ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 21 - लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे व क्रीडा प्रबेधिनीचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांना मंगळवारी लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. लाच घेताना पकडण्यात आलेल्यांमध्ये माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अलका कांबळे तसेच मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड या दोघांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंपरीतील उद्यमनगर येथे महापालिकेची क्रीडा प्रबोधिनी शाळा आहे. विद्यार्थी खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने ही क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यात आली आहे. खेळाडूंसाठी वेळोवेळी क्रीडा शिबिरे आयोजित केली जातात. या क्रीडा शिबीरातील खेळाडूंना अल्पोपहार पुरविण्याचे काम दिलेल्या कॅन्टीन ठेकेदारास बील मंजूरीसाठी लाचेची मागणी केली. अनुकुल अहवाल आणि बील मंजुरीसाठी १४ मार्च २०१७ ला त्यांनी २५ हजार रुपये लाच रकमेची मागणी केली. अशी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली होती. त्यातील ५ हजार रूपये मुख्याध्यापकासाठी, उर्वरित २० हजार रूपये शिक्षणाधिकाऱ्यांसाठी मागण्यात आले होते. ठरल्यानुसार पैसे घेऊन आलेल्या व्यकतीकडून मंगळवारी क्रीडाप्रबोधिनी शाळेजवळ त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली. मुख्याध्यापक राठोड यांना रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले. शिक्षणाधिकारी कांबळे यांना द्यावयाची रक्कमही राठोड यांनीच स्विकारली. त्यावेळी त्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. मुख्याध्यापक बाबासाहेब अंबादास राठोड (३४,रा.रहाटणी), शिक्षणाधिकारी अलका ज्ञानेश्वर कांबळे (५४,रा.एचए कॉलनी) यांना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
लाचलुचपत प्रतिबंधक पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक राजू चव्हाण, चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार सुनील शेळके, पोलीस शिपाई किरण चिमटे, कारले, महिला पोलीस निरिक्षक गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.