जाचक अटीमध्ये अडकली शैक्षणिक सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 01:20 AM2018-10-25T01:20:29+5:302018-10-25T01:20:40+5:30
शैक्षणिक सहलीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहलींचे नियोजन जाचक अटींमध्येच अडकल्याचे दिसून येत आहे.
- मंगेश पांडे
पिंपरी : शैक्षणिक सहलीसाठी जाचक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे शाळांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहलींचे नियोजन जाचक अटींमध्येच अडकल्याचे दिसून येत आहे.
प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहली आयोजित करताना सहलीच्या परवानगीसाठी शिक्षण उपसंचालक यांना प्रस्ताव पाठविले जातात. मात्र, हे प्रस्ताव पाठविले जात असताना शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणेही आवश्यक आहे. याबाबत पुणे विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी नियमावली आखून दिली असून, याबाबतचे परिपत्रकही प्रसिद्ध केले आहे. या परिपत्रकात सहलीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी नमूद आहे. यंदाच्या वर्षापासून सहलीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विम्याबाबतचे पत्र, तसेच सहलीसाठी विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याबाबतही सांगितले आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा विमा उतरविण्यासह वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विमा शाळा उतरविणार की पालक हा संभ्रम आहे.
प्राचार्यांचे शिफारस पत्र, हमीपत्र, सही-शिक्क्यासह विद्यार्थ्यांची यादी, ठिकाणाबाबतची माहिती, संस्था व्यवस्थापनाचे परवानगी पत्र, बसबाबत माहिती, विद्यार्थ्यांच्या यादीसह आरटीओ पासिंग परवाना, विद्यार्थ्यांच्या विम्याच्या प्रती, पालक व विद्यार्थ्यांचे संमतीपत्र, विद्यार्थ्यांच्या रक्तगटाबाबतची माहिती, विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे बैठकीचे प्रमाणपत्र.
>शिक्षक, पालक यांचे प्रबोधन गरजेचे
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, विकासात्मक, तसेच ज्ञानात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक स्थळी सहलीचे आयोजन करावे. सहल नेण्यापूर्वी दोन प्रशिक्षित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहलीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी, तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे. सोबत प्रथमोपचार पेटी असावी, स्थानिक डॉक्टरांचे तसेच ज्या ठिकाणी सहल जाणार आहे तेथील शासकीय रुग्णालयांचे संपर्क क्रमांक सोबत ठेवावेत. सहलीचा आराखडा पालकांपर्यंत पोहोचवला जावा, पालकांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. विद्यार्थी व पालकांकडून संमतीपत्रक घेणे बंधनकारक आहे. यासह सहली नेताना आरटीओने मान्य केलेल्या वाहनांतूनच सहली घेऊन जाव्यात. सहलीसाठी शाळा व्यवस्थापनाची परवानगी घेण्यात यावी, शाळेत सहल समिती स्थापन करावी. शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचे प्रबोधन करावे.
>शालेय अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. मात्र, सहलीसाठी घालण्यात आलेल्या अटी जाचक असल्याने अडचण निर्माण झाली आहे. अशा जाचक अटींमध्ये काहीशी शिथिलता आणावी.
- सूर्यकांत भसे, प्राचार्य, ज्ञानदीप विद्यालय, रुपीनगर