स्थायी समितीचे आठ सदस्य निवृत्त, नव्यांची मोर्चेबांधणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 03:35 AM2018-02-01T03:35:19+5:302018-02-01T03:35:24+5:30
स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह समितीतील आठ सदस्य ३० एप्रिलला निवृत्त होतील. बुधवारी झालेल्या समितीच्या सभेत उपस्थित अधिकारी व काही नगरसेवकांच्या हस्ते चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली.
पुणे : स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह समितीतील आठ सदस्य ३० एप्रिलला निवृत्त होतील. बुधवारी झालेल्या समितीच्या सभेत उपस्थित अधिकारी व काही नगरसेवकांच्या हस्ते चिठ्ठी काढून निवृत्त सदस्यांची नावे निश्चित करण्यात आली.
मोहोळ यांच्यासह भाजपाचे हरिदास चरवड, योगेश समेळ, बॉबी टिंगरे, (एकूण ४), रेखा टिंगरे, प्रिया गदादे (राष्ट्रवादी), अविनाश बागवे (काँग्रेस), नाना भानगिरे (शिवसेना) हे आठ सदस्य निवृत्त झाले. मोहोळ यांचेही नाव चिठ्ठीत निघाल्यामुळे त्यांना एका वर्षातच समितीतून बाहेर पडावे लागणार आहे. समितीचे आठ सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात. समितीचे
हे पहिलेच वर्ष असल्याने या वेळी निवृत्त सदस्यांची नावे चिठ्ठी काढून ठरवण्यात आली.
आता पुढील वर्षी ज्यांचा दोन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होईल, असे आठ सदस्य निवृत्त होतील.
दरम्यान, सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांमध्ये आता प्रथम समितीत येण्यासाठी व नंतर अध्यक्षपद मिळवण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महापौरपद महिला राखीव झाल्यामुळे ज्येष्ठ असूनही महापौरपदाची संधी हुकलेले सुनील कांबळे, महापौरांच्या प्रभागातील असल्यामुळे कोणतीच संधी न मिळालेले हेमंत रासने, तसेच शहर सुधारणा समितीत काम करण्याची फारशी संधी न मिळाल्यामुळे नाराज असलेले महेश लडकत हे समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. त्याशिवाय युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष असलेले नगरसेवक दीपक पोटे हेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. युवकांना संधी द्यावी, असे त्यांचे म्हणणे असून ते त्यांनी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवले आहे.
बहुतेक समित्या तसेच स्थायी समितीसह महापौरपदाचाही कार्यकाल संपुष्टात येत असल्यामुळे येत्या महिन्यात महापालिकेत सत्ताधारी भाजपात तसेच अन्य राजकीय पक्षांमध्येही बरीच राजकीय घुसळण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील वर्षभरात शहरात अनेक नवे व मोठे प्रकल्प सुरू होत आहेत, त्यामुळे स्थायी समितीत किमान सदस्य तरी व्हावे, यासाठी विरोधी पक्षातही हालचाली सुरू आहेत.
भाजपात दोन गट; पुन्हा महिलेचीच वर्णी
भलीमोठी म्हणजे ९८ इतकी सदस्यसंख्या असलेल्या व सभागृहात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपातही आता नेत्यांच्या नावे दोन गट पडल्यात जमा आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांना मानणाºया नगरसेवकांची संख्या जास्त आहे, मात्र दुसºया पक्षातून ऐन निवडणुकीच्या वेळी पक्षात प्रवेश घेऊन निवडून आलेल्या अनेक नगरसेवक खासदार संजय काकडे यांना मानणारे आहेत. त्यातील बरेचसे उपनगरांमधील आहेत. सत्तापदांच्या वाटपात आपल्याला खड्यासारखे बाजूला ठेवण्यात आले, अशी त्यांची भावना आहे. त्यामुळेच आता दुस-या वर्षात सत्तापद मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
काही महिला सदस्यांनीही या पदावर काम करण्याची तयारी पक्षाकडे दर्शवली असल्याची माहिती मिळाली. भाजपाच्या एकूण सदस्यसंख्येमध्ये महिला नगरसेवकांची संख्या उल्लेखनीय आहे. मात्र महापौरपद अडीच वर्षांसाठी महिला राखीव आहे. त्याची सव्वा वर्षाची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यमान महापौर मुक्ता टिळक यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला की त्या पदावर पुन्हा महिलेचीच वर्णी लावावी लागणार आहे. समितीचे अध्यक्षपद व महापौरपदही महिलांकडे दिले जाण्याची शक्यता कमी आहे.