आळंदीत डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी रस्त्यावर केले आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 19:33 IST2025-01-11T19:33:33+5:302025-01-11T19:33:53+5:30
अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांची समजूत काढली.

आळंदीत डंपरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू; संतप्त नागरिकांनी रस्त्यावर केले आंदोलन
आळंदी : पुणे - आळंदी रस्त्यावर देहू फाट्यानजीक भरधाव डंपरने पायी चालणाऱ्या महिलेला धडक दिली देऊन झालेल्या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. देहूफाट्यानजीक शनिवारी (दि. ११) दुपारी ही घटना घडली. विठाबाई बबन साळुंखे (वय ७२ रा. काळेवाडी, चऱ्होली बु, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी घटनास्थळी थेट रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
''आमची घरे रस्त्याला लागून आहेत. परिणामी रस्त्याने ये - जा करणाऱ्या वाहनांपासून आमच्या जीवाला कायमच धोका आहे. त्यामुळे संबंधित नगरपरिषदेने आमचे सर्वांचे पर्यायी जागेवर स्थलांतर करून द्यावे'' अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली. सुमारे अर्धा तासांहून अधिक वेळ हा रस्ता आंदोलकांनी अडविला होता. अखेर पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करून संतप्त नागरिकांची समजूत काढली. त्यानंतर रस्त्यावर झालेली वाहतुक कोंडी सुरळीत करण्यात आली.
दरम्यान आळंदी परिसरात डंपरचे अपघात वाढत असून यापूर्वीही आळंदीतील वडगाव रस्त्यावर डंपरच्या धडकेने तीन ते चार निष्पाप लोकांचे बळी घेतले आहेत. अशा वाढत्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने ठोस पावले उचलण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.