पाया उखडणारी निवडणूक

By admin | Published: February 26, 2017 03:41 AM2017-02-26T03:41:55+5:302017-02-26T03:41:55+5:30

काही दशके महापालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या व दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी ही निवडणूक ठरली आहे़

Election booth | पाया उखडणारी निवडणूक

पाया उखडणारी निवडणूक

Next

पिंपरी : काही दशके महापालिकेवर अधिराज्य गाजविणाऱ्या व दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेत भागीदारी करणाऱ्या काँग्रेसचा पाया उखडून टाकणारी ही निवडणूक ठरली आहे़ भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाणामारीत काँग्रेसला नियोजनबद्ध प्रचार करून उभारी घेण्याची चांगली संधी या निवडणुकीत होती़ पण, काही नेत्यांनी आघाडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये उमेदवारी निश्चित करण्यात घोळ घालण्यात आला़ एकाच जागेसाठी दोन-दोन उमेदवारांना ए व बी फॉर्म देऊन गोंधळ निर्माण केला़ त्यामुळे काही जणांना ‘पंजा’ हे चिन्ह मिळू शकले नाही़
शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सर्वांना बरोबर घेऊन प्रचाराचा डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न केला; पण इतरांची म्हणावी तेवढी साथ त्यांना मिळाली नाही़ भाजपाने ज्या पद्धतीने प्रचाराचा धुरळा उडवत केंद्रीय नेते, राज्यपातळीवरील नेत्यांच्या सभा, पत्रकार परिषदा घेऊन प्रचारात आघाडी घेतली़ काँग्रेसला मात्र तेवढा प्रभावी प्रचार करणे शक्य असूनही नियोजनाअभावी ते करू शकले नाहीत़ अनेक माजी आमदार नेते हे केवळ प्रमुख नेते आले, की काँग्रेस भवनमध्ये येताना दिसत होते़
राष्ट्रवादीबरोबर आघाडी करायची की नाही, या संभ्रमात उमेदवार व कार्यकर्ते राहिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला एक प्रभाग सोडता कोठेही झाला नाही़ एकेकाळी एकहाती सत्ता मिळविणाऱ्या काँग्रेसला यंदा कशीबशी दोन आकडी संख्या गाठता आली. उपमहापौर मुकारी अलगुडे हे प्रभाग क्रमांक १६मध्ये चौथ्या क्रमांकावर गेले़ तीन वर्षांपूर्वी केंद्रात व अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या पराभवानंतर काँग्रेस अजूनही जागी झाली नसल्याचे या निकालाने दाखवून दिले़
राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायला अनेकांचा विरोध होता़ आघाडीचा दोनच प्रभागांत काँग्रेसला फायदा झाल्याचे दिसते़ त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समन्वय साधण्यासाठी कोअर कमिटीची स्थापना काँग्रेसने केली होती़ तसेच प्रभागातील काँग्रेस उमेदवारांना काय अडचणी आहेत, हे समजून घेण्यासाठी आणि त्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांची नियुक्ती केली होती़ परंतु, या कोअर कमिटीची एकही बैठक झाली नसल्याचे सांगितले जाते़ दुसरीकडे भाजपा, शिवसेना, अगदी मनसेनेही वृत्तपत्रे, टीव्ही वाहिन्यांवरुन प्रचाराच्या जाहिराती केल्या़ पण, त्याबाबत प्रदेश पातळीवर काँग्रेसकडून कोणतेही नियोजन नव्हते़ उमेदवारांना पाठबळ देण्याच्या दृष्टीने काँग्रेसने पक्ष म्हणून हात आखडता घेतला होता़ त्याचा एकत्रित परिणाम म्हणून अन्य महापालिकांप्रमाणेच पुण्यातही ‘पानिपत’ झाले़

Web Title: Election booth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.