निवडणूक खर्चात दुप्पट वाढ
By admin | Published: February 1, 2017 04:40 AM2017-02-01T04:40:59+5:302017-02-01T04:43:16+5:30
महापालिका निवडणुकसाठी एका इच्छूक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ४ लाखांच्या मर्यादेमध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून
पिंपरी : महापालिका निवडणुकसाठी एका इच्छूक उमेदवाराला खर्च करण्यासाठी ४ लाखांच्या मर्यादेमध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाकडून मंगळवारी काढण्यात आले आहेत. त्यामुळे अवघ्या ४ लाखात निवडणुकीचा हिशोब कसा दाखवायचा याच्या चिंतेत असलेल्या इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांनी पैशांचा मोठयाप्रमाणात वापर करून निवडणुकीवर प्रभाव पाडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांनी निवडणुकीमध्ये करावयाच्या खर्चावर मर्यादा घातली जाते. राज्यातील आगामी दहा महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या, त्यावेळी उमेदवारांना खर्च करण्यासाठी ४ लाख रूपये निश्चित करण्यात आली होती. मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभुमीवर इतक्या खर्चात निवडणुक लढविणे अवघड असल्याने त्यामध्ये दुप्पटीने वाढ करून ती ८ लाख इतकी करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाकडून घेण्यात आला आहे.
राज्य निवडणुक आयोगाकडून १५० ते १६१ सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांच्या उमेदवारांसाठी १० लाख इतकी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. ११६ ते १५० सदस्यसंख्या असलेल्या महापालिकांसाठी ८ लाखांपर्यंत, ८६ ते ११५ सदस्यसंख्येच्या महापालिकांसाठी ७ लाख, ६५ ते ८५ सदस्यसंख्या असलेल्या पालिकांसाठी ५ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदांसाठी ४ लाख ते ६ लाख तर पंचायत समित्यांसाठी ३ ते ४ लाख इतकी उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. (प्रतिनिधी)
उमेदवारी अर्जानंतर खर्चाचा होणार हिशेब
उमेदवाराने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर मतदान होईपर्यंत त्याच्याकडून निवडणुकीसाठी केला जाणारा खर्च मोजला जातो. निवडणुकीसाठी दररोज केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती त्यांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावी लागते. उमेदवारांना घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा त्यांना जास्तीचा खर्च करता येत नाही, तसे आढळून आल्यास त्यांच्यावर निवडणुक आयोगाकडून कारवाई केली जाते.