निवडणुकीने तिजोरीत भर
By Admin | Published: February 15, 2017 02:18 AM2017-02-15T02:18:53+5:302017-02-15T02:18:53+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत वसुलीसाठी कोणतीही यंत्रणा न लावता महापालिकेच्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदानाच्या दिवसापर्यंत वसुलीसाठी कोणतीही यंत्रणा न लावता महापालिकेच्या तिजोरीत विविध करांपोटी दहा कोटी रुपये जमा झाले आहेत. मार्च एंडच्या तोंडावर ही वसुली झाली आहे.
महापालिकेचा कोणताही कर वेळेत भरण्याची मानसिकता अजूनही काही लोकांची नाही. विशेषत: मालमत्ताकर वर्षानुवर्षे भरला जात नाही. कोणी विचारत नाही, म्हणून करदाताही किंवा मिळकतधारकही त्याकडे लक्ष देत नाही; पण थकबाकी दर वर्षी वाढतच असतो. ज्या वेळी हा आकडा अर्ध्या, पाऊण लाखावर जातो, त्या वेळी मात्र महापालिकेचा वसुलीसाठी तगादा सुरू होतो. मार्च महिना आला, की कर वसुलीसाठी मोहीम आखली जाते. त्यासाठी खास पथके स्थापन केली जातात. लोकांना आवाहन करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. तरीही वसुली होत नाही. वसुलीसाठी कोणतेही खास प्रयत्न न करताही महापालिकेला केवळ निवडणुकीच्या निमित्ताने दहा कोटी रुपये कररूपाने मिळाले आहेत.
नगररचना विभागाचाही ना हरकत दाखला उमेदवारांसाठी आवश्यक होता. या ठिकाणी प्रीमियम किंवा घर पूर्णत्वाचा दाखला या बाबी तपासून पाहिल्या जात होत्या. अशा विविध मार्गांनी निवडणुकीच्या काळात वसुलीसाठी विशेष मोहीम न राबविताही महापालिकेच्या तिजोरीत दहा कोटी जमा झाले आहेत.(प्रतिनिधी)