देहूरोड परिसरासह किवळे -विकासनगर भागात बत्ती गुल ; उकाड्याने नागरिक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 11:28 AM2020-05-16T11:28:48+5:302020-05-16T11:29:39+5:30
वादळी पाऊस पडला एक तास मात्र वीज पुरवठा पहिल्या दिवशी चार तास व दुसऱ्या दिवशी सलग दहा तास खंडित..
किवळे : उच्च दाब वाहिनीत बिघाड झाल्याने महावितरणकडून विकासनगर -किवळे , देहूरोड परिसरातील चिंचोली , किन्हई ,झेंडेमळा परिसरात गुरुवारी चार तास व व शुक्रवारी सलग दहा तास वीज पुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी व शुक्रवारी रात्री साडेअकरापर्यंत या भागातील नागरिकांसह लहान मुलांना व वृद्धांना उकाड्याने अक्षरशः हैराण झाले होते. वादळी पाऊस गुरुवारी सायंकाळी एक तास पडला मात्र, वीज पुरवठा पहिल्या दिवशी चार तास व दुसऱ्या दिवशी सलग दहा तास खंडित झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
किवळे - विकासनगर परिसरात तसेच देहूरोड परिसरातील चिंचोली, किन्हईसह विविध भागात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास वादळी पाऊस सुरु झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारी सायंकाळी सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस पडला मात्र गुरुवारी रात्री साडेअकरा व शुक्रवारी दुपारपासून रात्री साडेअकरापर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांनी महावितरणच्या कारभाराबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली . वीज पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लहान मुले व वृद्धांसह सर्व नागरिकांना विविध समस्यांना समोर जावे लागले. दूरचित्रवाणी संच , पंखे बंद असल्याने सर्वच घटक त्रस्त झाले होते. लॉकडाऊनमुळे अगोदरच घरात बसून वैतागलेल्या लहान मुलांना समजावणे पालकांना कठीण जात होते.
शुक्रवारी सकाळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता.दुपारी दीडच्या सुमारास खंडित झालेल्या वीज पुरवठा रात्री साडे अकराच्या सुमारास सुरळीत झाल्याने नागरिकांची उकाड्याने झालेली घालमेल थांबली. दरम्यान उंच इमारतीत असलेली उदवाहक यंत्रे ( लिफ्ट )बंद असल्याने जेष्टाचें खूप हाल झाले. जमिनीतील पाण्याच्या टाकीतील पाणी इमारतीच्या वरच्या टाकीत पाणी चढविण्यात न आल्याने विविध समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला. दरम्यान देहूरोड भागात वीज पुरवठा करणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीत देहूजवळ तसेच किवळे- विकासनगर भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनीत रावेत येथे बिघाड झाल्याचे महावितरणच्या अभियंत्यांकडून सांगण्यात आले आहे.