तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु; महावितरण विरोधात चिंचवडमध्ये आंदोलन
By विश्वास मोरे | Published: August 21, 2024 04:49 PM2024-08-21T16:49:02+5:302024-08-21T16:49:31+5:30
वीज नसल्यामुळे चोऱ्या वाढल्या असून या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसतोय
पिंपरी: चिंचवड स्टेशन, आनंद नगर परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून वीजेचा लपंडाव सुरु आहे. महावितरणाच्या गलथान व नियोजन शून्य कारभाराविरोधात नागरी हक्क कृती समितीने आंदोलन केले. जनआक्रोश धडक मोर्चातून निषेध केला.
मोहननगर, चिंचवड स्टेशन, आनंदनगर, साईबाबानगर, गवळीवाडा, इंदिरानगर, काळभोरनगर, महात्मा फुलेनगर, रामनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकर नगर, परशुरामनगर या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. विजेच्या लपंडावामुळे या विभागातील नागरिक हैराण झाले होते. त्यामुळे श्री दत्त मंदिर चौक मोहननगर येथून सकाळी नागरिकांच्या जन आक्रोश धडक मोर्चाला सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. मोहननगर ते थरमॅक्स चौकातील महावितरण कार्यालयापर्यंत पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
हा मोर्चा मोहननगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, विद्यानगर, शंकरनगर, रामनगर, परशुरामनगर मार्गे महावितरणच्या थरमॅक्स चौकातील आकुर्डी विभागीय कार्यालयात धडकला. त्यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता अतुल देवकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अशोक जाधव हे मोर्च्याच्या सामोरे आले. त्यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले. त्यावर मोर्चाच्या ६ मागण्यांबाबत मुद्दानिहाय लेखी पत्र दिले. या मोर्चामध्ये माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, वैशाली काळभोर, संजय जगताप यांच्यासह सामाजिक, राजकीय, व्यापार, लघुउद्योजक, हातगाडी, पथारी टपरीधारक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मारुती भापकर म्हणाले, ' महावितरणच्या गलथान व नियोजन शून्य कारभारामुळेच अनेक नागरिकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रासाला सामोरी जावे लागत आहे. या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे म्हणून अनेकांनी वेगवेगळी निवेदना महावितरणला दिली होती. मात्र यावर कायमस्वरूपी कुठलाही उपाय निघाला नाही, म्हणून मोर्चा काढला. आमच्या भागात नागरिकांना डेंगू, चिकनगुनियाची साथ सुरु आहे. त्यामुळे या भागातील रुग्णालयामध्ये रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयामध्ये वीज नसल्याने त्रास रुग्णांना होत आहे. तसेच वीज नसल्यामुळे चोऱ्या वाढल्या असून या विजेच्या लपंडावामुळे अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नुकसान होऊन आर्थिक फटका नागरिकांना बसत आहे.''