स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ‘या’ गावांत पोहोचली वीज; मुलभूत सुविधांची मात्र वानवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 03:47 PM2018-01-27T15:47:50+5:302018-01-27T15:52:55+5:30
कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे.
कामशेत : कामशेत पासून सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणे मावळातील अतिदुर्गम भागात स्वातंत्र्य काळापासून अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. येथे जाण्यासाठी नाणे ते नाणोलीपर्यंत पक्का रस्ता असून त्या पुढे दहा किलोमीटर कच्चा रस्ता आहे. या रस्त्याचे काम आजपर्यंत झाले नाही. सात वर्षांपूर्वी पवन चक्की प्रकल्प उभा राहिला त्यावेळी हा कच्चा रस्ता बनवण्यात आला होता. तोच अजूनही सुरू आहे. या वस्त्यांमध्ये वीज नाही. मात्र गावातील सुशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन आपल्या भागात वीज आणण्यासाठी मागील काही वर्षांपासून अतोनात मेहनत घेत अनेकांचे उंबरे झिजवले. त्यांच्या या मेहनतीला यश आले असून काही दिवसांपूर्वी गावात वीज पोहचली असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
नाणे मावळातील डोंगर माथ्यावर असणाऱ्या आठ धनगर वाड्या असून पूर्ण वाड्या मिळून १७० कुटुंब येथे राहतात. या आठ वाड्या ह्या प्रत्येकी वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीने या वाड्यांना मूलभूत सुविधा पुरवण्याचे कष्ट घेतले नाही. येथील नागरिकांचा फक्त निवडणुकीसाठीच विचार केला जातो. मतदानापुरताच येथे स्थानिक राजकिय कार्यकर्ते उपस्थित राहून आश्वासन द्यायचे ते फक्त आश्वासनच रहायचे परंतु कुठलाच विकास या वाड्यांचा करू शकले नाही.
यातील करंजगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मोरमारवाडी पठार धनगर वस्ती भागात वीज आली असून याचप्रमाणे इतर भागात लवकरच वीज येणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावर काही स्थानिक सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन सामाजिक कर्तव्य समजून आपल्या धनगर वाड्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, या उद्देशाने आमदार बाळा भेगडे यांच्या नावाने निवेदन तयार करून ते त्यांना दिले. लवकरच या सुविधा पोहचू असे आश्वासन त्यांनी दिले व त्यानंतर त्यांनी महावितरण कंपनीला सर्व्हे करण्यास सांगितले. यावर महावितरण कंपनीच्या लोकांनी स्थानिक लोकांची मदत घेत सर्व्हे केला व त्याचे इस्टमेंट बनवून मंजुरीसाठी पाठवले
त्यावर स्थानिक तरुणांनी सतत आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांच्याकडे व महावितरण कंपनीकडे पाठपुरावा केला यावर आमदार बाळा भेगडे यांनी येथील सुविधा वंचित असलेल्या वाड्यांची स्थिती पाहता तेथील पहिल्या टप्प्या साठी मोरमारवाडी येथील पठारावरील धनगर वाडीला डीपीडीसी स्कीममधून थ्री फेज लाईट मंजूर करून पहिल्या टप्याचे काम चालू केले आहे तेथील पूर्ण लाईन ओढून झाली आहे.
या वाड्यांच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यासाठी नामदेव शेडगे, दत्ता आखाडे, विठ्ठल शेडगे, भाऊ शेडगे यांनी मेहनत घेतली तर आमदारांच्या वतीने नितीन गाडे यांनी सतत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून मोलाचे सहकार्य त्यांनी केले. या शिवाय माऊ ची मोरमारवाडी ते डोंगरवाडी सटवाई वाडी या भागात खासदार निधीतून रस्त्याचे काम सुरू आहे. हा रस्ता पठारावरील मोरमारवाडी पठार, वडेश्वर पठार, उकसान पठार, पाले पठार, कुसवली पठार, कांबरे पठार, शिरदे पठार, कुसुर पठार आदी वस्त्यांपर्यंत करावा, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे.