कर्मचाऱ्यांची नागरिकांशी हुज्जत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 07:49 AM2018-05-31T07:49:39+5:302018-05-31T07:49:39+5:30
चिंचवडगावातील टपाल कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
रावेत : चिंचवडगावातील टपाल कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होत आहे. अनेकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना टपाल मिळण्याकरिता हेलपाटे मारावे लागत आहे. टपाल सेवा वेळेवर भेटत नसल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. चापेकर चौक येथे विभागाचे मुख्य डाकघर आहे. कार्यालयाच्या दर्शनी भागातच ग्राहकांना आम्ही उत्तमोत्तम सेवा देण्याचे वचन देणारा सूचनाफलक झळकतो आहे. परंतु या कार्यालयातील काउंटर क्रमांक दोन आणि तीन बंद होते. केवळ पहिल्या काउंटरवरील कामकाज सुरू होते. मात्र या काउंटर क्रमांक एकवरील कर्मचाºयारी नागरिकांशी उर्मटपणे बोलत असल्याचे दिसून आले.
टपाल कार्यालयात बराच वेळ रांगेत ताटकळत उभे राहूनही विलंब लागत असल्याने व शेवटी तांत्रिक कारण पुढे करून ग्राहकांना परत पाठविण्यात येत होते. त्यामुळे स्पीड पोस्ट, पीएलआय व इतर पोस्टाचे व्यवहार करायला येणाºया सामान्य व ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा तीव्र संताप व्यक्त केला. पोस्टमन संपावर गेल्याचे कारण पुढे करीत नागरिकांना परत पाठवले जाते. येथे ज्येष्ठ नागरिकांना उद्धटपणाची वागणूक मिळते. कर्मचारी समन्वयाचा अभाव यावरून पोस्टाची प्रतिमा लक्षात येते. मुख्य अधीक्षकांनी ग्राहकांच्या सेवेकडे जातीने लक्ष देऊन दर्जा सुधारावा अशी मागणी असंख्य ग्राहकांनी केली आहे. येथील कार्यालयामधून पत्रव्यवहार होत असून, या ठिकाणी आलेली महत्त्वाची कागदपत्रे, लायसन्स, आधार कार्ड, चेक बुक, कागदपत्रेदेखील वेळेवर मिळत नाहीत. विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात आलेले पत्रदेखील मिळत नसून, नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहेत. याबाबत संबंधित पोस्टमास्तरशी चर्चा केली असता त्यांच्याकडूनही उर्मट उत्तरे मिळाली.
वारंवार हेलपाटे मारूनसुद्धा महत्त्वाची कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने काही वेळा कार्यालयातील कर्मचारी आणि पोस्टमास्तर यांच्याशी नागरिकांचे वाद होतात. अशा वेळी पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात येईल, अशी तंबी पोस्टमास्तरकडून संबंधित नागरिकांना दिली जाते.
चिंचवड येथील या टपाल कार्यालयास पोस्टमनची २२ पदे मंजूर आहेत. परंतु येथे केवळ १० पोस्टमन कार्यरत आहेत, तर काही ठेकेदारीवर नियुक्त केले आहेत. त्यामुळे यांच्या कामात सुसूत्रता आढळून येत नाही. अनेक नागरिक पुणे येथील टपाल कार्यालय किंवा संबंधित कार्यालय येथे स्वत:च्या असलेल्या टपालाबाबत चौकशी करण्यास गेल्यास तुमचे टपाल काही दिवसांपूर्वीच चिंचवड येथे पाठवले आहेत. आम्ही त्याबाबतचा नंबर तुम्हाला देतो तेथे जाऊन चौकशी करा, असे सांगितले जाते. चिंचवड येथे चौकशी केली तर तुमचे
टपाल तुमच्या भागातील पोस्टमनकडे कधीच दिले आहेत. आमच्याकडे नोंददेखील आहे. मिळून जाईल,
असे सांगितले जात असल्याचे प्रकार घडत आहेत.
कार्यालयातील तक्रारपुस्तिकेत नागरिकांनी केलेल्या तक्रारी सोडविण्यात आलेल्या नसून ती तक्रार पुस्तिका धूळखात पडलेली आहे. आजतागायत कसल्याही प्रकारची पाहणी वरिष्ठ आधिकारी करत नसल्याचे समोर येत आहे. यावरून या पोस्ट आॅफिसला कोणी वाली नसल्याचे आढळते. याबाबत यापूर्वी वृत्तदेखील प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर यामध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. काही पोस्टमन यांच्याकडे नागरिक सांगत असलेल्या तक्रारींबाबत विचारणा केली असता या तक्रारींबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे सांगतात. या कार्यालयातील पोस्टमास्तर कैलास वाघमारे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनीही बेजबाबदार उत्तरे दिली.
कामानिमित्त मी वारंवार टपाल कार्यालयात येतो; परंतु येथील काही कर्मचारी विचारपूस केल्यास माहिती देण्याएवजी उद्धटपणे बोलतात. आज मला काही पत्र स्पीड पोस्टने पाठवायची होती. काही ठिकाणचे पिन कोड माहिती नसल्याने चौकशी केल्यानंतर येथील कर्मचाºयाने माहिती देण्याएवजी माझ्याशी हुज्जत घातली. आमच्याकडे पिन कोड नसतात. तुम्ही कोठेही जाऊन शोधा, मगच स्पीड पोस्ट करता येईल, असे या कर्मचाºयांनी सांगितले. त्यांच्यावर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे. - भागवत सरोदे, निवृत्त कर्मचारी
स्पीड पोस्टने माझा आयकर विभागाचा धनादेश आला आहे, असा मेसेज आल्यानंतर याबाबत चौकशी करण्यासाठी मी कार्यालयात गेल्यावर मला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच कर्मचाºयांच्या संपाचे कारण पुढे करीत नंतर येण्याचे सांगितले. यावर मी पोस्ट मास्तर यांच्याकडे चौकशीसाठी गेलो असता त्यांची आणि माझी शाब्दिक चकमक झाली. पोस्ट मास्तर यांनी मला पोलिसांच्या हवाली करण्याची तंबी देत चिंचवड पोलीस स्टेशनला फोन लावला. आम्ही आमची कागदपत्रे स्वीकारण्यासाठी येतो तेव्हा आम्हाला अशी वागणूक दिली जाते. नागरिकांसमवेत बेजबाबदारपणे वागणाºया पोस्ट मास्तर यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. - राहुल लबडे, वाल्हेकरवाडी
आम्ही नेहमी नागरिकांना सहकार्य करीत असतो. दररोज अनेक नागरिक या ना त्या कारणावरून माझ्याशी व कार्यालयीन कर्मचाºयांशी हुज्जत घालत असतात. अरेरावी करतात. त्यामुळे नाईलाजास्तव मला पोलीस स्टेशनला फोन करावा लागतो. आम्ही नागरिकांशी सहकार्य करीत असतो. नागरिकांनीही आम्हाला सहकार्य करावे. काही पोस्टमन संपावर असल्याने नागरिकांची महत्त्वाची पत्रे वेळेत मिळण्यास विलंब होत आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून नागरिकांना त्यांची पत्रे वेळेत कशी मिळतील, याबाबत प्रयत्न केला जाईल.
- कैलास वाघमारे, पोस्टमास्तर, चिंचवड टपाल कार्यालय
माझ्या मुलासमवेत मी बँकेचे चेक बुक घेण्यासाठी येथे मागील चार-पाच दिवसांपासून चकरा मारत आहे. याबाबत चौकशी केली की पोस्टमन संपावर आहेत, ज्यांच्याकडे आहे तो कर्मचारी पत्र वाटपास गेला आहे, संध्याकाळी सहा वाजता या अशी दररोज वेगवेगळी उत्तरे दिली जातात. ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य करण्याची वृत्ती येथील कर्मचाºयांची नाही. त्यांना योग्य ते शासन झाले पाहिजे. - विजया अपळे, ज्येष्ठ नागरिक, चिंचवडगाव
मागील पाच दिवसांपासून माझ्या बँकेच्या एटीएम कार्डसाठी चकरा मारत आहे. याबाबत विचारणा केल्यास ते आलेच नाही, आले की आम्ही देऊ, आम्हाला तुमचे कार्ड ठेवून काय करायचे आहे, याबाबत तुमच्या बँकेला विचारणा करा, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. नाही तर पोलीस स्टेशनला तक्रार करण्याची धमकी येथील कर्मचारी देतात.
- नितीन पचपिंड, बिजलीनगर
माझ्या काही कागदपत्रांच्या चौकशीसाठी येथे चकरा मारत आहे. परंतु त्याबाबत मला योग्य माहिती या कार्यालयाकडून दिली जात नाही. आता वेळ नाही संध्याकाळी या, अशी उत्तरे दिली जातात. कार्यालयीन वेळ साडेपाचपर्यंत असताना आम्हाला ६ वाजता का म्हणून बोलावले जाते.
- अक्षय रामदास भोंडवे, स्थानिक युवक