मुहूर्त गाठताना पुढाऱ्यांची दमछाक
By admin | Published: May 5, 2017 02:49 AM2017-05-05T02:49:58+5:302017-05-05T02:49:58+5:30
मावळ तालुक्यात सध्या लग्नाचा हंगाम शिगेला पोचला असून, एकेका दिवशी आठ-दहा विवाह सोहळ्यांची निमंत्रणे मिळतात
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात सध्या लग्नाचा हंगाम शिगेला पोचला असून, एकेका दिवशी आठ-दहा विवाह सोहळ्यांची निमंत्रणे मिळतात. मुहूर्त एकच वेळ असल्याने लग्नाला उपस्थित राहण्यासाठी पुढारी व लोकप्रतिनिधी यांची कमालीची धावपळ होत असल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
यंदा चैत्र आणि वैशाख महिन्यात विवाहाचे चांगले मुहूर्त असल्याने मंगल कार्यालय मालकांसह बॅण्ड पथक व ढोल, लेझीम पथकास सुगीचे दिवस आले आहेत. तालुक्यात अनेक बहुतांशी ठिकाणी डीजे वाद्यकामास बंदी असल्याने डीजेच्या कर्णकर्कश आवाजापासून तालुक्यातील जनतेची मात्र बऱ्यापैकी सुटका झाली आहे.
सध्या विवाह सोहळ्यांचा धुमधडाका सुरू झाला आहे. एकेका दिवशी नात्यागोत्यातील व मित्र परिवारातील आठ-दहा विवाह सोहळ्यांची निमंत्रणे येऊ लागल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. त्यातही राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांची तर अधिकच दमछाक होताना दिसत आहे.
कोणाचाही विवाह असला, तरी गावातील राजकीय पक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची नावे निमंत्रण पत्रिकेत छापण्याची प्रथा रूढ झाली आहे. मग त्यांचा त्या कुटुंबाशी संबंध असो वा नसो! भावकीच्या बरोबरीने त्यांना स्थान दिले जात आहे. जाणकार घराण्यांनी मात्र या नावांना तिलांजली दिल्याचे पहावयास मिळते. (वार्ताहर)
पत्रिकेवर वाढले निमंत्रक
कार्यकर्त्यांकडे कोणतेही पद नसले तरी ‘सामाजिक कार्यकर्ता’ असा उल्लेख करूनही त्यांची नावे
निमंत्रण पत्रिकेत छापली जातात. त्यामुळे पत्रिका मोठ्या आकारात छापल्या जात आहेत. पत्रिकेत नाव व लग्नाला उपस्थित राहण्याची गळ यजमानांकडून घालण्यात येत असल्याने पुढाऱ्यांना या साहेळ्याला उपस्थित राहावे लागत आहे.
एकाच मुहूर्तावर आठ-दहा विवाह
एकाच दिवशी आठ-दहा विवाह व विवाहाची वेळ ही थोड्याफार फरकाने तीच असल्याने ती साधताना पुढारी व लोकप्रतिनिधी यांची दमछाक होत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे विवाह सोहळ्यातील सत्कार आता बऱ्यापैकी बंद झाले आहेत. आता फक्त शाब्दिक सत्कार केले जातात. सत्कारमूर्ती जावयांची संख्या मात्र वाढलेली आहे. जावयही स्वाभिमानी असल्याने नवरा -नवरी विवाहमंचावर आल्याशिवाय ते सन्मान घेण्यास जातच नाहीत. जावई सन्मान घेण्यास आता चुलत-मावस जावयांचाही सत्कार केला जात आहे.