महापालिकेची पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच
By admin | Published: May 25, 2016 04:44 AM2016-05-25T04:44:36+5:302016-05-25T04:44:36+5:30
महापालिकेच्या वतीने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच आहे. महापौरांच्या सिक्कीम दौऱ्यानंतर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम सिक्कीम दौऱ्यावर गेल्या आहेत.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच आहे. महापौरांच्या सिक्कीम दौऱ्यानंतर सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम सिक्कीम दौऱ्यावर गेल्या आहेत. पुढील आठवड्यात महिला बालकल्याणच्या सदस्या आणि महापौर शकुंतला धराडे या बर्लिन दौऱ्याला जाणार आहेत. महापौरांच्या दौऱ्याला शासनाचा हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा आहे.
महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर लाखो रुपयांची उधळपट्टी होत आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे तीस लाख रुपयांची उधळपट्टी दौऱ्यांवर झाली आहे. राज्यात दुष्काळाची पार्श्वभूमी असताना आणि पुणे महापालिकेचे पदाधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करण्याकरिता गेले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहलीचा आनंद लुटत आहेत. मागील महिन्यात महापौर शकुंतला धराडे यांच्यासह पर्यावरण, जैवविविधता समितीचे पदाधिकारी दौऱ्यांवर गेले होते. त्यासाठी सुमारे आठ लाखांचा खर्च करण्यात आला होता. या दौऱ्यात सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम या गेल्या नव्हत्या. त्यामुळे मंगळवारी कदम यांच्यासह सात सदस्य सिक्कीम दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यात मंदाकिनी ठाकरे, सुजाता पालांडे, सविता साळुंखे, सुमन नेटके आणि वैशाली काळभोर या नगरसेविकांचा समावेश आहे. या दौऱ्यावर महापालिका ३ लाख ८० हजार रुपये खर्च करणार आहे. तर महापालिकेतील महिला आणि बालकल्याण समितीच्या सदस्यांसह नऊ जण ९ ते १६ जून रोजी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी सुमारे चार लाख खर्च अपेक्षित आहे. महापौर शकुंतला धराडे यांना पुढील महिन्यात बर्लिनला जाणार आहेत. या दौऱ्यासाठी त्यांनी शासनाकडे परवानगी मागितली आहे. (प्रतिनिधी)
दौऱ्यांवरील उधळपट्टी थांबवा
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या अनावश्यक दौऱ्यांवरील उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, महापालिकेतील सत्तेच्या जोरावर दौऱ्यांवर होणाऱ्या उधळपट्टीची गरज आहे. ती रोखण्याची गरज आहे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.