'जगद्गुरू', 'विठ्ठलहृदया', 'महाराज' नावांची सजावट; १५० किलो फुलांनी सजतो तुकोबांचा पालखीरथ!
By रोशन मोरे | Published: June 19, 2023 04:56 PM2023-06-19T16:56:06+5:302023-06-19T16:56:41+5:30
रथाच्या सजावटीसाठी झेंडूच्या दीडशे किलो फुलांचा वापर, खर्च येतोय तब्बल ५० हजार
पिंपरी : जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे जातो आहे. मुक्कामाच्या ठिकाणी लाखो भाविक पालखीच्या, संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी रांगा लावत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून जाणाऱ्या रथाची फुलांनी केलेली सजावट सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. रथावरती 'जगद्गुरू', 'विठ्ठलहृदया', 'महाराज' अशी दररोज वेगवेगळी नावे फुलांमध्ये सजवली जात आहेत. रथाच्या सजावटीसाठी झेंडूच्या दीडशे किलो फुलांचा वापर केला जातो. तसेच वेगवेगळी फुले वापरली जात आहेत. पुण्यातील मार्केट यार्ड गुलटेकडी इथून दररोज ही ताजी फुलं आणली जात आहे.
रथाच्या सजावटीसाठी दररोज सहा ते आठ तासांचा कालावधी लागतो. दररोज रथ आठ ते बारा तास प्रवास करत असल्याने उन्हात टिकतील आणि आकर्षक वाटतील, अशा चांगल्या दर्जाच्या फुलांची निवड केली जाते, अशी माहिती सजावटकार भागवत शिवतारे यांनी दिली.
सकाळी दहा वाजता पुण्याच्या मार्केट यार्डकरिता फुले आणण्यासाठी गाडी रवाना केली जाते. पालखी मुक्काम तळावरून गेलेली गाडी ही साधारण चार वाजेपर्यंत पुन्हा पालखीचा मुक्काम असेल त्या ठिकाणी पोहोचते. साधारण चार वाजता सजावटीच्या कामाला सुरुवात होते. रथ मुक्कामस्थळी येईपर्यंत फुलांच्या माळा बनवण्याचे काम सुरू होते. रथ पालखी स्तळावर पोचला असता प्रथम आदल्या दिवशी केलेली सर्व सजावट काढून घेतली जाते. सजावटीच्या कामासाठी आठ जण काम करत असतात.
या फुलांचा होतोय वापर
झेंडू, शेवंती, अस्टर, लीली, गुलझडी, सात प्रकारचे गुलाब, नवीन प्रकारचे सूर्यफूल, मोगरा यासह उपलब्ध फुलांचा वापर केला जातो. तसेच हिरव्या वेलसाठी कामिनीचा वापर केला जातो. उन्हातदेखील हा वेल ताजा राहतो.
५० हजार रुपये खर्च
उन्हाळ्यामुळे फुलांच्या वाढलेल्या किमती, सजावटीसाठी लागणारे मनुष्यबळ, फुले आणण्यासाठी लागणारा प्रवास खर्च या सगळ्या गोष्टींचा विचार केला असता ४५ ते ५० हजार रुपये खर्च होत असल्याचे सजावटकारांनी सांगितले.
''पालखी सोहळ्यापूर्वीच १५ दिवस आधी रथाच्या सजावटीचे नियोजन केले जाते. रथावर लावण्यात येणारे नावदेखील निश्चित केले जाते. सजावटीसाठी भाविक अर्थसाह्य करत असतात. रथ जास्तीत जास्त आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. - भानुदास महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख''