पिंपरी-चिंचवडकरांचा मनोभावे सेवेने वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 05:38 PM2018-07-07T17:38:27+5:302018-07-07T17:49:19+5:30

वारकरी, भाविक भक्तांच्या सेवेसाठी विठ्ठलवाडीसह शहरातील नागरिकांनी पालखी मुक्कामस्थळी भेट दिली.

emotional send off to warkari | पिंपरी-चिंचवडकरांचा मनोभावे सेवेने वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप

पिंपरी-चिंचवडकरांचा मनोभावे सेवेने वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप

Next
ठळक मुद्देआकुर्डीतील मुक्कामानंतर पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ

पिंपरी : श्री क्षेत्र देहुतून पंढरपुरकडे प्रस्थान ठेवलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी आगमन झाले. आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखी दुसऱ्या मुक्कामासाठी विसावली. शनिवारी सकाळी ६ वाजता पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. साधु-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा या भावनेतून शहरवासीयांनी वारकरी भाविक भक्तांची सेवा केली. त्याचबरोबर पालखी सोहळयातील वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला. 
आषाढी वारीसाठी संत तुकोराम महाराज पालखीचे गुरुवारी देहूगावातून प्रस्थान झाले. शुक्रवारी सायंकाळी पालखी आकुर्डी, विठ्ठलवाडीतील विठ्ठल मदिरांत विसावली. वारकरी, भाविक भक्तांच्या सेवेसाठी विठ्ठलवाडीसह शहरातील नागरिकांनी पालखी मुक्कामस्थळी भेट दिली. मंदिर परिसरात टाळ, मृदंगाच्या निनादाने वातावरण भारावून गेले. पालखीच्या दर्शनासाठी आकुर्डीत नागरिकांची गर्दी झाली होती. पहाटेसुद्धा नागरिक दर्शनासाठी पालखी मुक्कामस्थळी हजर होते. कपाळी भगवा टिळा, खांद्यावर भगव्या पताका, मुखात हरिनामाचा गजर करणाऱ्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पहाटे ५ वाजता आकुर्डीतून पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. आकुर्डी, चिंचवड, पिंपरी  या ठिकाणी महामार्गावर दुतर्फा पालखी सोहळा पाहण्यासाठी आणि संत तुकाराम महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी अबाल वृध्दांची गर्दी झाली होती. पुणे- मुंबई महामार्गावरून पुण्याकडे हा पालखी सोहळा मार्गस्थ होणार असल्याने या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी रस्त्याने वळविली होती. चिंचवड, पिंपरी, मोरवाडी येथे सकाळी नागरिक पालखीच्या दर्शनासाठी उभे होते. 
.............................
वारकऱ्यांना फराळ वाटप, पाणी, दूध वाटप करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्त्यांची लगबग 
सकाळी खराळवाडीतील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात सकाळी ९ वाजता पालखी विश्रांतीसाठी विसावली. त्यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली झाली होती. त्या ठिकाणी वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आले. फराळ आटोपल्यानंतर साडेनऊच्या सुमारास पालखी मार्गस्थ झाली. दुपारी १२ वाजता पालखी सोहळा दापोडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. त्या ठिकाणीही वारकऱ्यांनी भोजन केले. विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकयांसाठी प्रसादवाटप, पाणीवाटप, चहापाणी, चप्पल दुरुस्ती, दाढी-कटींग, आरोग्य तपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात आल्या.   

Web Title: emotional send off to warkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.