पाडापाडीच्या राजकारणाला जोर
By admin | Published: February 15, 2017 02:02 AM2017-02-15T02:02:49+5:302017-02-15T02:02:49+5:30
कोणी कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतली, याची कल्पना मतदाराला येत नाही. बंडखोरीच्या भीतीने सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका
चिंचवड : कोणी कोणत्या पक्षाची उमेदवारी घेतली, याची कल्पना मतदाराला येत नाही. बंडखोरीच्या भीतीने सर्वच राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केला. तरीही शेवटच्या क्षणात अनेक इच्छुकांना फोडण्यात नेते मंडळींना यश आल्याने आगामी निवडणूक अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र कोणाला पाडायचे कोणाला चालवायचे याचे काम जोमात सुरू आहे. यावरून पाडापाडीचे राजकारण होणार याची चर्चा आता शहरात जोर धरू लागली आहे.
शहरात सर्वच राजकीय पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी आपण सक्षम असल्याची आरोळी दिली आहे. फोडाफोडीचे राजकारण पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर येत आहे.
शहर परिसरामध्ये अनेक पॅनेलच्या उमेदवारांनी सर्व पॅनेलऐवजी एकट्यानेच प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता आहे.
ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी इतरत्र प्रयत्न केले. यात काहींना यश आले, तर काही अपयशी ठरले.काहींनी तर जाणून बुजून अपक्ष उमेदवारी ठेवली. अर्थातच अशा अपक्ष उमेदवारांना विरोधी पक्षातील नेते मंडळींनी पाठबळ दिसत असल्याचे चित्र शहरात दिसत आहे. काट्याने काटा काढायचा हे धोरण अनेकांनी वापरले आहे.(वार्ताहर)