कर्मचारी सुटीवर, कचरा रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:58 AM2018-11-14T00:58:58+5:302018-11-14T00:59:15+5:30
देहूगावमध्ये मंगळवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस आठवडे बाजार भरतो़ ऐन दिवाळी सणानिमित्त दि. ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान
देहूगाव : दिवाळीनिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना सुटी असल्याने तीर्थक्षेत्र देहूगावसह विठ्ठलनगर, माळीनगर, वडाचा माळ परिसरात आठवडाभर स्वच्छतेची कामे न झाल्याने ऐन दिवाळीमध्ये परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी पसरल्याची तक्रार प्रकाश काळोखे यांनी गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
देहूगावमध्ये मंगळवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस आठवडे बाजार भरतो़ ऐन दिवाळी सणानिमित्त दि. ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी सुटीवर आहेत. याकाळात प्रशासनाने साफसफाईसाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नव्हती. परिणामी या काळात गावातील व परिसरातील साफसफाई, स्वच्छतागृहाची स्वच्छता केली नसल्याने परिसरात घाणीचे व कचºयाचे साम्राज्य पसरले होते़ नाले, स्वच्छतागृह तुबल्याने दुर्गंधी पसरली. इतर वेळीही सफाई कर्मचारी आठ तास कामे न करता, कामचुकारपणा करीत किरकोळ व दिखाव्यातील साफसफाई करून इतरत्र फिरत अथवा बसत असतात. तर काही कामगार खासगी घराची कामे करीत असतात. या बाबत वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे काळोखे यांनी सांगितले.
डेंगी, स्वाइन फ्लू, वाढत्या डासांचा प्रादुर्भावास पोषक असणाºया वातावरणातही वेळोवेळी औषध फवारणी न करणे, घाणीचे साम्राज्य तसेच तुंबणारी गटारी, नाले, स्वच्छतागृहाने नागरिकांच्या आरोग्याशी ग्रामपंचायत प्रशासन खेळत असल्यास त्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी अन्यथा नागरिकांना घरपट्टी न भरण्याचे आवाहन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.