‘दमदाटी’वरून कर्मचारी महासंघ-सेनेत जुंपली
By admin | Published: July 7, 2015 04:24 AM2015-07-07T04:24:35+5:302015-07-07T04:24:35+5:30
महापालिकेतील विविध विभागांसाठीच्या साहित्यखरेदीत गैरव्यवहार होत असल्याची बाब शिवसेनेच्या नगरसेविकांनी आयुक्त, स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली होती.
पिंपरी : महापालिकेतील विविध विभागांसाठीच्या साहित्यखरेदीत गैरव्यवहार होत असल्याची बाब शिवसेनेच्या नगरसेविकांनी आयुक्त, स्थायी समितीच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यास न जुमानल्याने अधिकाऱ्याविरोधात महिलांनी आंदोलन केले. त्यात अधिकाऱ्यांना दमदाटी आणि अर्वाच्च शिवीगाळ केल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाने केला असून, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या कर्मचारी महासंघाने आंदोलनाचे व्हिडीओ चित्रीकरण पाहावे, मग आक्षेप घ्यावा, असा टोला नगरसेविका सीमा सावळे यांनी लगावला आहे. त्यामुळे साहित्य खरेदीच्या प्रकरणावरून महासंघ आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे.
शिवसेनेच्या नगरसेविका सावळे आणि आशा शेंडगे यांनी शिलाई मशिन, सायकल, सोनोग्राफी, नोटा मोजण्याचे मशिन, यूपीएस, प्रिंटर खरेदीत गोलमाल होत असल्याचे उघडकीस आणले होते. याबाबत अधिकारी आणि सत्ताधाऱ्यांच्या निदर्शनास आणूनही विषय मंजूर केल्याने महिलांनी अधिकाऱ्यांना आंदोलनाचा हिसका दाखविला होता. या आंदोलनात अधिकाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ आणि दमदाटी झाली. आयुक्तांनी याप्रकरणी गांभीर्याने विचार करून अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा कर्मचारी महासंघाने दिला आहे.
त्याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे म्हणतात - महापालिकेत शिवसेनेच्या सावळे आणि शेंडगे या नगरसेविकांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करून, अर्वाच्च भाषेचा वापर करून गोंधळ घातला. याबाबतची माहिती आम्हाला समजली. अशा प्रकारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय थांबवायला हवा. या नगरसेवकांनी असाच प्रकार दोनदा केला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात भीतीचे वातावरण आहे. नगरसदस्यांनी जनतेचे प्रश्न सनदशीर मार्गाने मांडणे अपेक्षित आहे. घडलेला प्रकार खेदजनक आहे. या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालून अन्याय थांबवायला हवा.’’
दुसरीकडे महापालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यामुळेच पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने आमच्या आंदोलनाबाबत गैरसमज पसरविण्याच्या उद्देशाने आयुक्त राजीव जाधव यांना पत्र दिले आहे. भ्रष्टाचाराबाबत बोलल्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची वरकमाई बंद झाली आहे. अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा महासंघ प्रयत्न करीत आहे. महासंघाने कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तरी भ्रष्टाचाराविरोधातील आपली ही लढाई यापुढेही सुरूच ठेवणार असल्याचेही नगरसेविका सावळे यांनी कळविले आहे.
सावळे निवेदनात म्हणतात - साहित्य खरेदीत भ्रष्टाचार सुरू आहे. बाजारभावापेक्षा अव्वाच्या सव्वा दराने या साहित्यांची खरेदी होत आहे. हे सर्व कागदोपत्री सिद्ध करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. प्रसंगी लोकशाहीने दिलेल्या शस्त्राचा वापर करून आंदोलनही करीत आहे. मात्र, आंदोलनामुळे अनेक अधिकाऱ्यांची वरकमाई बंद झाली. त्यामुळे महासंघाने भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. शिवीगाळ आणि दमदाटीचाही आरोप त्यांनी केला आहे. वास्तविक, आपण केलेल्या सर्व आंदोलनाचे चित्रीकरण केले आहे. ते तपासावे.’’(प्रतिनिधी)