मागासवर्गीय तरूणांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:06 AM2017-11-06T07:06:19+5:302017-11-06T07:06:23+5:30
मागासवर्गीय, भटक्या जाती-जमातींतील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पिंपरी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. व्यवसाय प्रशिक्षणांतर्गत या तरुणांना तीन ते २१ तासांचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे
पिंपरी : मागासवर्गीय, भटक्या जाती-जमातींतील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पिंपरी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. व्यवसाय प्रशिक्षणांतर्गत या तरुणांना तीन ते २१ तासांचे रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाणार आहे. गच्चीवर बाग फुलविणे, खते व कंपोस्ट तयार करणे, कोंबडीपालन, बोन्साय बनविणे अशा विविध १९ व्यवसायांचा त्यात समावेश आहे. प्रशिक्षण देणाºया संस्थेला प्रतिलाभार्थी ८०० ते २८०० रुपयांपर्यंत शुल्क मोजण्यात येणार आहे.
शहर सुधारणा समितीच्या नुकत्याच झालेल्या पाक्षिक सभेत आयत्या वेळच्या विषयास मान्यता दिली. अध्यक्षस्थानी सागर गवळी होते. विशेष म्हणजे सभापती सागर गवळी यांनीच हा प्रस्ताव मांडला. त्यास उपसभापती शैलेश मोरे यांनी अनुमोदन दिले. महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत महापालिका हद्दीतील अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमातीतील तरुणांना त्यांच्या विकासाकरिता १९ प्रकारचे अल्प कालावधीचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे येथील एका सरकारी संस्थेमार्फत हे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रत्येक प्रशिक्षण दोन ते सात दिवसांचे असणार आहे.