अभिजात संगीत जगण्याला देते बळ - राजेश ढाबरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:40 AM2017-10-20T02:40:52+5:302017-10-20T02:41:07+5:30
संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांची हिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले.
संगीत माणसाला ताजेतवाने ठेवते. बालपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे तथागत बुद्धांच्या जीवनावरील गाण्यांची
हिंदी भाषेत निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. पहिलाच अल्बम जनतेने डोक्यावर घेतल्याने नवनिर्मितीला बळ मिळाले. मोठमोठ्या गायकांनी गाणी गायली. आईच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झाले. संगीत जगण्याला बळ देते. एक तरी कला प्रत्येकाने जपली पाहिजे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आई रेडिओ ऐकायची तेव्हा आईमुळे माझ्याही कानांवर संगीताचे सूर पडायचे; पण तेव्हा त्याचा अर्थबोध व्हायचा नाही. तरीही सूर निरागस असल्यामुळे ते अलगदपणे माझ्यावर परिणाम करून गेले. आईच्या प्रेरणेमुळेच मी गायक-संगीतकार झालो, असे सांगत प्रशासकीय अधिकारी राजेश ढाबरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना आयुष्यातील जीवनगाणी कशा पाऊलवाटा बनल्या तो प्रवास उलगडला. बाल्यावस्थेत असतानाच चित्रपट पाहण्याची आवड जडली. वाटेल ते करून चित्रपट पाहायचो. केवळ चित्रपटातील गाणी दृश्य स्वरूपात बघावीत, म्हणून हा खटाटोप असायचा. आम्ही जिथे राहत होतो, तिथे कोष्टी समूह बांधवांचे भजनांचे कार्यक्रम ऐकायला जात होतो. तिथे कधी-कधी गाण्याची संधी मिळायची. भजन गायला लागलो. १९७५-७६चा काळ असेल, तेव्हा भजनांची गोडी लागली. सूर तिथेच गवसला. त्या वेळी जोडले गेलेले बंध आजही मैत्रीच्या स्वरूपात घट्ट आहेत.
पं. बच्छराज व्यास विद्यालयात शिकत असताना माझी आवड ‘पॅशन’ बनू लागले. त्याचे कारण म्हणजे शाळेतील सर्व उपक्रमांमधील माझा पुढाकार आणि अभ्यासातील गतीमुळे शिक्षक माझ्यावर विशेष लक्ष द्यायचे. शाळेतच गायक-कलाकार अशी ओळख निर्माण झाली. विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस कधीच सोडले नाही. बक्षिसांतून प्रेरणा मिळत गेली. घरातील वातावरण शैक्षणिक, सांस्कृतिकही आहे. वर्गात पहिला असायचो. नागपूरला शिवाजी सायन्स कॉलेजमध्ये अकरावीला असताना सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अग्रस्थानी असायचो. ‘कोई नजराणा लेकर आया मै तेरा दिवाना...’ असे गीत तेव्हा सादर केले. कलेतून एक आत्मिक समाधान मिळते. माणूस फ्रेश राहतो. इंजिनिअरिंगला असताना रॅगिंग मोठ्या प्रमाणात चालायचे; पण आमचे सिनिअर गाणे म्हणायला सांगून मला सोडून द्यायचे. परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हणून इथेच ओळख मिळाली. सोलो प्रोग्राम सुरू केले होते. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यात यश मिळाल्यावर पहिली पोस्टिंग हैदराबादला होती. असिस्टंट कमिशनर म्हणून तिथे काम करीत असतानाही नाटक, पथनाट्य, संगीत यांत सहभाग असायचा. नाटकाला संगीत देणे, प्रत्यक्ष त्यात अभिनय करणे असे छोटे-मोठे प्रयोग सुरूच होते. आजही गाणे नेहमी माझ्यासोबत राहिले आहे. तथागत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान जगापर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांचा विचार गाण्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आणि पहिलाच अल्बम जगप्रसिद्ध झाला. लिरिक्स आणि म्युझिक दोन्ही एकाच वेळी करण्याचा एक यशस्वी प्रयोग मी केला. पत्नी भावना संगीत विशारद आहे. त्यामुळे माझा शास्त्रीयदृष्ट्या संगीताचा अभ्यास नसला, तरी ती ते सगळे जुळवून आणत होती. पहिल्या अल्बममध्ये ८ गीते, तर दुसºया अल्बममध्ये १० गीते आहेत. मेरिट आणि क्वॉलिटीबरोबरच बॉलिवूड टच असल्यानेच लता मंगेशकर यांनी ‘बुद्धं सरणं गच्छामि...’ हे गीत माझ्या अल्बममध्ये गायिले आहे. त्यांच्याबरोबरच सोनू निगम, शंकर महादेवन, सुरेश वाडकर, श्रेया घोषाल, अनुज अलोरा, आशा भोसले यांनी मी लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गायली आहेत.