बससेवा सक्षम करणार

By admin | Published: July 5, 2017 03:13 AM2017-07-05T03:13:36+5:302017-07-05T03:13:36+5:30

पिंपरी-चिंचवडला सापत्नभावाची वागणूक देणाऱ्या पीएमपीने शहरातील महिलांसाठी स्वतंत्र बससेवा आणि अंतर्गत बसव्यवस्था सक्षम

Enabling bus service | बससेवा सक्षम करणार

बससेवा सक्षम करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवडला सापत्नभावाची वागणूक देणाऱ्या पीएमपीने शहरातील महिलांसाठी स्वतंत्र बससेवा आणि अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करावी, या मागणीसाठी आवाज उठविणाऱ्या भाजपा पदाधिकारी आणि पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सोमवारी चाय पे चर्चा झाली. पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत दोन तास ही चर्चा झाली. मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी तीन महिन्यांत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन येथील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या परिस्थितीची पाहणी करावी. तसेच शहरातील अंतर्गत बसव्यवस्था सक्षम करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत आणि महिलांसाठी स्वतंत्र बसव्यवस्था सुरू करावी, अशी मागणी सीमा सावळे यांनी केली होती. त्यावर चर्चा करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे आणि सावळे यांना चहाचे निमंत्रण दिले होते. त्यानुसार भाजपा पदाधिकारी आणि मुंढे यांच्यात पीएमपीच्या कार्यालयात चर्चा झाली.
दोन तास चाललेल्या या बैठकीत मुंढे यांनी पिंपरी-चिंचवडमधील बसव्यवस्थेबाबत सर्वांचे मत ऐकून घेतले. त्यानंतर शहरांतर्गत बसव्यवस्था सक्षम नसल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच नव्याने घेण्यात येणाऱ्या ८० मिनीबस पिंपरी-चिंचवडमधील अंतर्गत वाहतुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि बदललेली भौगोलिक परिस्थिती पाहता पीएमपीच्या जुन्या मार्गांचे पुनरावलोकन करण्याची सूचना सावळे यांनी केली. मुंढे यांनी ती मान्य केली. तसेच पीएमपीने एचपीसीएल कंपनीसोबत डिझेल दर कमी करण्याबाबत चर्चा केली. कंपनी प्रति लिटर ८० पैसे कमी दराने डिझेल पुरवठा करण्यास तयार झाल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नाशिक फाटा ते हिंजवडी या मार्गावर एसी बस सुरू करण्याची सूचना केली. त्यावर मुंढे यांनी पहिल्या टप्प्यात निगडी ते पुणे मनपा या मार्गावर एसी बस लवकरच सुरू करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर मार्गांचा निश्चितपणे विचार होणार असल्याचे ते म्हणाले.


महिलांसाठी राखीव जागांवर आठवड्यात निर्णय

पिंपरी-चिंचवडमधील महिलांसाठी गर्दीच्या वेळी स्वतंत्र बसव्यवस्था किंवा बसमध्ये ७० ते ८० टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत येत्या आठवडाभरात निर्णय घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. याशिवाय औद्योगिक भागात अंतर्गत बसव्यवस्था, तसेच ताथवडे परिसरातील महाविद्यालयांसाठी सर्वेक्षणानंतर बस सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे संचलन तूट कमी करणे, पीएमपीची चांगली बससेवा उपलब्ध करून देणे, बस मार्गांचे योग्य नियोजन करणे, त्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मुंढे यांनी सांगितले. आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीएमपीला सक्षम करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, मदतीच्या बदल्यात बसव्यवस्था सक्षम झाली पाहिजे, असेही त्यांनी बजावले.

Web Title: Enabling bus service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.