सभापतिपदासाठी चुरस, वर्णी लागण्यासाठी नेत्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 07:04 AM2017-11-06T07:04:50+5:302017-11-06T07:04:57+5:30
शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन शिक्षण समिती लवकरच स्थापन होणार आहे.
पिंपरी : शिक्षण हक्क कायद्यान्वये पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळ बरखास्त झाल्यानंतर नवीन शिक्षण समिती लवकरच स्थापन होणार आहे. या समितीवर नऊ नगरसेवकांची वर्णी लागणार आहे. महासभेच्या मान्यतेनंतर नववर्षात शिक्षण समितीचे कामकाज सुरू होणार असून, शिक्षण समितीवर सभापती आणि उपसभापतिपदी वर्णी लावण्यासाठी भाजपात चुरस लागली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित असलेल्या शिक्षण मंडळाच्या कारभारात गैरव्यवहार होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली. त्यामुळे सर्व शिक्षण मंडळे बरखास्त करावीत, असा आदेश उच्च न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी दिला होता. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे महापालिका सभागृह अस्तित्वात असेपर्यंत म्हणजेच फे ब्रुवारी २०१७ पर्यंत शिक्षण मंडळ स्वतंत्र अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
जून महिन्यात कार्यकाल संपला. शाळा सुरू होण्याच्या कालखंडात म्हणजेच २ जूनला आयुक्तांनी
शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचे आदेश काढले. त्यांच्या अधिपत्याखालील मालमत्ता, कर्मचारीवृंद स्वत:च्या अधिकारकक्षेत घेतले. शिक्षण मंडळाला प्रदान करण्यात आलेले सर्व अधिकार संपुष्टात आणले गेले. नवीन समिती स्थापन होणार आहे.
कोणत्या गटाचा सभापती
समितीवर वर्णी लागावी, यासाठी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे आणि खासदार अमर साबळे यापैकी कोणत्या गटाच्या सदस्यास संधी मिळणार याबाबत चर्चा आहे. सभापतिपदासाठी आशा शेंडगे, विलास मडिगेरी, प्रा. सोनाली गव्हाणे, सुजाता पालांडे, माया बारणे, प्रियंका बारसे, प्रा. उत्तम केंदळे यांच्या नावाची चर्चा आहे.