वाकडमध्ये प्राधिकरणाची अतिक्रमण कारवाई
By Admin | Published: May 10, 2017 04:11 AM2017-05-10T04:11:40+5:302017-05-10T04:11:40+5:30
येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत उभारलेल्या एका शाळेसह कस्पटे वस्ती टेलिफोन एक्सेंजशेजारील नंदीवाल्यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वाकड : येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेत उभारलेल्या एका शाळेसह कस्पटे वस्ती टेलिफोन एक्सेंजशेजारील नंदीवाल्यांच्या १०० झोपड्यांवर प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी कारवाई करीत अतिक्रमण हटविले. कारवाईच्या सुरुवातीला थोडा विरोधवगळता कारवाई सुरळीत पार पडली. तत्पूर्वी शालेय साहित्याचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व साहित्य बाहेर काढण्यासाठी शाळा प्रशासनाला वेळ देण्यात आली.
दुपारी १२ला प्राधिकरणाने सर्वे क्रमांक २०८ मधील नंदीवाल्यांच्या पालांकडे मोर्चा वळविला. मुलांच्या शाळांची आबाळ अन् तरुणांच्या कामाची अडचण सांगून या रहिवाशांनी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप खलाटे यांची भेट घेऊन एक वर्ष मुदतवाढ घेतली होती. मुदत संपूनही या झोपड्या न हटविल्याने थेट कारवाई करण्यात आली. अखेर रहिवाशांनी अधिकाऱ्यांकडे संसारोपयोगी वस्तू बाहेर काढण्याची मुभा मागितल्याने उन्हाच्या कहरात पाल मोडून सामान बांधाबांधीची धांदल उडाली. झोपड्यांवर बुलडोजर फिरणार असल्याने सर्वजण हवालदिल झाले होते. लहानगे भांबावून गेल्याने त्यांची रडारड सुरु होती. उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपअभियंता तथा क्षेत्रीय अधीक्षक वसंत नाईक यांच्या नेतृत्वाखाली शाखा अभियंता के. जी. तळीखेडे, माहिती अधिकारी वर्षा पवार यांनी कारवाई पार
पाडली.