निगडीत पदपथाला अतिक्रमणाचा विळखा
By admin | Published: May 30, 2017 02:34 AM2017-05-30T02:34:01+5:302017-05-30T02:34:01+5:30
निगडीतील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस पदपथ आहेत. पंरतु, हे पदपथ सध्या हातगाडीधारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले
लोकमत न्यूज नेटवर्क
निगडी : निगडीतील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस पदपथ आहेत. पंरतु, हे पदपथ सध्या हातगाडीधारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर पदपथ आहेत, त्यातील अर्ध्याअधिक पदपथावर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. जे काही पदपथ अतिक्रमणांपासून वाचले आहेत, त्यातील बहुतांश वापरण्याजोगे राहिलेले नाहीत. विशेषत: निगडीकडून त्रिवेणीनगरकडे जाणारा रस्ता, निगडीकडून प्राधिकरणकडे जाणाऱ्या पदपथावर अतिक्रमणे करण्यात आली आहेत. परिणामी, वर्षानुवर्षे निगडीतील वाहतुकीचा कोंडलेला श्वास मोकळा होण्याऐवजी अजूनच कोंडला जात आहे व त्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना होत आहे.
शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यावरील पदपथ हा वाहतुकीचा महत्त्वाचा भाग मानला जातो़ मात्र, याकडे महत्त्वाच्या गरजेकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. पदपथ हा नंतरचा विषय म्हणून प्रशासनाकडून कायमस्वरूपी दुर्लक्षित विषय राहिला आहे. पदपथावरील वर्षानुवर्षांच्या पक्क्या अतिक्रमाणांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कधीतरी एखाद्यावेळेस अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झालीच, तर दुसऱ्या दिवशी ह्यजैसे थेह्ण स्थिती झाल्याशिवाय राहात नाही. गर्दीच्या ठिकाणी पदपथ आवश्यक असताना हातगाडीधारकांनी रस्त्याच्याकडेला अतिक्रमण केल्याने वाहनचालकांची चांगलीच गैरसोय होत आहे.
भेळ चौक प्राधिकरण
येथील एचडीएफसी बँकेची शाखा आहे, या शाखेला स्वतंत्र अशी पार्किंग व्यवस्था नसल्याने येथे येणारे नागरिक आपली वाहणे रस्त्याच्या दोन्ही बाजूस पार्क करतात, यामुळे जवळच शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व शाळेत सोडविण्यास येणाऱ्या पालकांना या बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या वाहनांचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे दररोज किरकोळ अपघाताचे प्रकार घडत आहेत. मात्र, याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
चालायचे कसे : नागरिकांचा सवाल
१जेथे कुठे पदपथ आहेत, यातील बहुतांश पदपथावर छोट्या-मोठ्या टपऱ्या, गाड्या, दुकाने सर्रास थाटण्यात आली आहेत. मात्र, अगदी दोन्ही बाजूंनी असलेल्या प्रचंड प्रमाणातील अतिक्रमणांनी पदपथ अक्षरश: गिळंकृत केले आहेत. या पदपथावर हॉटेल, चहा-नाष्ट्याच्या टपऱ्या, फळांच्या गाड्या, कपड्यांची छोटी दुकाने, नारळपाण्याच्या गाड्या याबरोबरच चक्क पदपथावर किंवा लगतच थाटण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. सगळ्यात वाईट म्हणजे पदपथावर पूर्णपणे अतिक्रमण आहेच; शिवाय पदपथापासून थेट रस्त्यावर पुन्हा दहा-दहा फुटांपर्यंत हातगाड्यांची अतिक्रमणे आली आहेत.
२त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यांवरूनच जावे लागते आणि दुहेरी अतिक्रमणामुळे मूळचा रस्ता अरुंद झाला आहे. अरुंद रस्त्यामुळे रुग्णवाहिका जाण्यास-येण्यास वारंवार अडचणी येतात आणि गंभीर-अतिगंभीर रुग्णांच्या जिवाशी रोजचाच खेळ सुरू असतो. निगडी पीएमपी बसस्थानक परिसरातील रस्त्यांच्या कडेला पदपथ असून, नसल्यासारखा झाला आहे. या भागात पदपथ नाहीसा झाल्यामुळे कुठेही वाहने थांबतात, रिक्षा-खासगी वाहनांची झुंबड असते, त्यामुळे पादचाऱ्यांना आणि विशेषत: प्रवासाहून आलेल्या किंवा प्रवासाला निघालेल्या पादचाऱ्यांचे नेहमीच हाल होतात.
वाहनांच्या पार्किंगसाठी फुटपाथ
अनेक भागांमध्ये फुटपाथ असूनही त्यावर चक्क वाहनांचे पार्किंग झाल्याचे दिसून येते. निगडीकडून दुर्गानगर चौक ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत दोन्ही बाजूस फुटपाथ असून, फुटपाथचा वापर चक्क दुचाकी-चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी होतो़ या रस्त्यावरील फुटपाथवरून एकही माणूस चालत जाऊ शकत नाही, अशी भयंकर स्थिती आहे आणि याकडे संबंधित यंत्रणांचे कायमचे दुर्लक्ष आहे.