निगडीतील फूटपाथवर अतिक्रमण
By admin | Published: April 29, 2017 04:08 AM2017-04-29T04:08:07+5:302017-04-29T04:08:07+5:30
निगडीतील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस फूटपाथ आहेत; पंरतु हे फूटपाथ सध्या हातगाडी धारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले आहेत.
निगडी : निगडीतील बहुतांश रस्त्याच्या दुहेरी बाजूस फूटपाथ आहेत; पंरतु हे फूटपाथ सध्या हातगाडी धारक व पार्किंगच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यापैकी ज्या रस्त्यांवर फूटपाथ आहेत त्यातील अर्ध्याअधिक फूटपाथवर सर्रास पक्की अतिक्रमणे झाली आहेत. जे काही फूटपाथ अतिक्रमणांपासून वाचले आहेत, त्यातील बहुतांश वापरण्याजोगे राहिलेले नाहीत. विशेषत: निगडीकडून त्रिवेणीनगरकडे जाणारा रस्त्या, निगडीकडून प्राधिकरणाकडे जाणाऱ्या फूटपाथवर अतिक्रमणे केली आहेत. परिणामी, वर्षानुवर्षे निगडीतील वाहतुकीचा कोंडलेला श्वास मोकळा होण्याऐवजी अजूनच कोंडला जात आहे आणि त्याचा नाहक त्रास सामान्य पादचाऱ्यांना होत आहे.
शहरातील छोट्या-मोठ्या रस्त्यावरील फूटपाथ हा वाहतुकीचा महत्त्वाचा भाग मानला जातो़ मात्र, याकडे महत्त्वाच्या गरजेकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. फूटपाथ हा नंतरचा विषय म्हणून प्रशासनाकडून कायमस्वरूपी दुर्लक्षित विषय राहिला आहे. फूटपाथवरील वर्षानुवर्षांच्या पक्क्या अतिक्रमाणांकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. कधीतरी एखाद्यावेळेस अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झालीच, तर दुसऱ्या दिवशी ह्यजैसे थेह्ण स्थिती झाल्याशिवाय राहात नाही.
अनेक भागांमध्ये फूटपाथ असूनही त्यावर चक्क वाहनांचे पार्किंग झाल्याचे दिसून येते. निगडीकडून दुर्गानगर चौक ते त्रिवेणीनगर चौकापर्यंत दोन्ही बाजूस फूटपाथ असून, फूटपाथचा वापर चक्क दुचाकी-चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी होत आहे. या रस्त्यावरील फूटपाथवरून एकही माणूस चालत जाऊ शकत नाही, अशी भयंकर स्थिती आहे आणि याकडे संबंधित यंत्रणांचे कायमचे दुर्लक्ष आहे.
लोकमान्य हॉस्पिटल जवळ महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. परंतु या बँकेला स्वतंत्र अशी पार्किंग व्यवस्था नसल्याने बँकेत येणारे ग्राहक आपली वाहने बँकेसमोरच लावतात. यामुळे या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या व किरकोळ आपघात वारंवार घडत असतात. बँकेसमोरच असलेल्या फूटपाथवर फळविक्रेते व खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांनी फूटपाथवरच ठाण मांडल्याने
येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.(वार्ताहर)