फळविक्रेत्यांचे अतिक्रमण
By admin | Published: June 2, 2016 12:29 AM2016-06-02T00:29:09+5:302016-06-02T00:29:09+5:30
शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त बनविण्यात आले. शहरात काही भागात बीआरटीएस रस्तेही बनविण्यात आले.
रहाटणी : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अनेक रस्त्यांचे रुंदीकरण करून रस्ते प्रशस्त बनविण्यात आले. शहरात काही भागात बीआरटीएस रस्तेही बनविण्यात आले.
मात्र अनेक ठिकाणी या रस्त्यावर हातगाडीवाले, फेरीवाले, छोटे व्यावसायिक यांनी अतिक्रमण केल्याने वाहनचालकांना वाहन चालविणे जिकिरीचे झाले आहे. अशा अतिक्रमणामुळे सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयासमोरील रस्त्यावर रोजच्या अपघातात वाढ झाली आहे.
सांगवी फाटा येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, तसेच अंडरग्राउंड रस्त्याचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वाहने संथ गतीने जातात. या रस्त्यावर ग्रामीण रुग्णालयाच्या समोर अनेक हातगाडीवाले, टेम्पोवाले विविध प्रकारचे फळ विक्री करण्यासाठी रस्त्याच्याकडेला उभे असतात. एक नव्हे, तर अनेक अनधिकृत व्यावसायिक या ठिकाणी रांगेत उभे असतात. हा माल खरेदी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला, काही वेळा रस्त्याच्या मध्यभागी सर्वच प्रकारचे वाहनचालक उभे राहत असल्याने या ठिकाणी इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
अनेक वेळा या ठिकाणी अपघात होत आहेत. या ठिकाणी असे प्रकार वारंवार घडत असताना पालिकेचा संबंधित विभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. या ठिकाणी अपघातात काहींना जीव गमवावा लागला आहे. तरीही क क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाला जाग येत नाही.
शहरातील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी पालिकेच्या संबंधित विभागाची आहे. मात्र हे विभागच काही प्रमाणात कुचकामी असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सांगवी फाटा येथील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
मात्र याकडे संबंधित विभाग गांभीर्याने पाहत नसल्याची खंत येथील नागरिक व्यक्त करीत आहेत. जर एखाद्या वेळी कारवाई करण्याचे ठरलेच, तर पथक पोहोचण्याच्या अगोदर व्यावसायिक गायब होतात. त्यामुळे या व्यावसायिकांना अभय नेमके कोणाचे हा खरा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे येथील व्यावसायिकांवर कारवाई करून पुन्हा या ठिकाणी हे व्यावसायिक थांबणार नाहीत याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)