बाजारपेठेत चालणेही मुश्कील, हातगाड्या, पथारीवाले यांचे अतिक्रमण; वाहने रस्त्यावर उभी केल्याने अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 02:51 AM2017-10-20T02:51:58+5:302017-10-20T02:52:14+5:30
दिवाळीनिमित्त बुधवारी व गुरुवारी देहूरोड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या मोटारी, रस्त्यावर खाद्यपदार्थ व इतर सामान विक्री करणा-या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतील...
देहूरोड : दिवाळीनिमित्त बुधवारी व गुरुवारी देहूरोड बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुतर्फा उभ्या करण्यात आलेल्या मोटारी, रस्त्यावर खाद्यपदार्थ व इतर सामान विक्री करणा-या हातगाड्या, पथारीवाले यांच्या अतिक्रमणाने खरेदीसाठी आलेल्या पंचक्रोशीतील ग्राहकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. चालणेही मुश्किल बनले होते. रस्त्यावर अतिक्रमण करणा-यांना व मोटार व दुचाकीचालकांना कोणतीही शिस्त लागलेली नसल्याचे चित्र दिसून आले आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट, देहूरोड बाजारपेठेतील विविध रस्त्यांवर अतिक्रमण करून दुकाने थाटल्याने वाहतुकीला व पादचाºयांना अडथळा होत असल्याने अनेकदा वाहतूककोंडी होत असल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक हैराण झाले होते. मुख्य रस्त्यावर हातगाड्या, छोटे व्यावसायिक, तसेच छोटे व्यापारी पथारी मांडून व्यवसाय करीत असल्याने, तसेच काही व्यापाºयांनी पदपथावर अतिक्रमणे केली असल्याने खरेदीसाठी येणाºया ग्राहकांना चालता येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कॅन्टोन्मेन्ट बोर्ड प्रशासन व पोलीस यंत्रणेने कारवाई केल्याशिवाय बाजारपेठेत शिस्त लागणे अशक्य असल्याचे मत काही शिस्तप्रिय व्यापाºयांनी व्यक्त केले. बेशिस्तपणाला कंटाळून, पार्किंग व्यवस्था नसल्याने पंचक्रोशीतील ग्राहक खरेदीसाठी इतरत्र जाऊ लागल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे अनेक व्यापा-यांनी सांगितले.
देहूरोड बाजारपेठेत खरेदीला उधाण
देहूरोड : लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा व भाऊबीजेसाठी देहूरोड येथील बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे.
लक्ष्मीपूजनासाठी लागणाºया रांगोळीपासून पूजासाहित्य, कपडे, आकर्षक वस्तू व गृह सजावटीपर्यंतच्या विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.
लक्ष्मीपूजनासाठी बाजारात लक्ष्मीच्या आकर्षक मूर्ती विक्रीसाठी आल्या आहेत. ३० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत लक्ष्मीची मूर्ती बाजारात उपलब्ध होत्या. याशिवाय प्रसादासाठी लाह्या, बत्ताशे, चिरंजी व पूजेसाठी लागणाºया साहित्याची खरेदी बुधवारी व गुरुवारी दिवसभर सुरू होती.
दिवाळीचे निमित्त साधून बाजारपेठेतील सर्व प्रमुख दुकानांत सध्या वेगवेगळ्या फॅशन्सच्या कपड्यांची, दागिन्यांची रेलचेल आहे. रेडिमेड कपडे, फटाके, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची लोकांनी खरेदी करीत असल्याचे चित्र दिसत होते. सोन्या-चांदीचे दागिने, दिवाळीसाठी आकाशकंदील, फटाके, फराळाचे तयार पदार्थ खरेदीसाठी सर्वत्र गर्दी दिसून आली. शोभेच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, तोरणे, रांगोळी, रांगोळीचे रंग, सुगंधी द्रव्य, अत्तरे, भेट द्यायच्या विविध वस्तू, लहान मुलांचे कपडे, आयुर्वेदिक औषधे, महिलांसाठीची सौंदर्य प्रसाधने, दिवाळी फराळ यासह अनेक वस्तूंची खरेदी केली जात आहेत.
प्रकाशाच्या सणात रस्ते अंधारात
देहूरोड : दिवाळी सणाला सोमवारी वसुबारसने सुरुवात झाली असताना लाखो दिव्यांनी देहूरोड बाजारपेठ व कॅन्टोन्मेन्ट परिसर उजळून निघालेले असताना परिसरातील विविध रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याचे चित्र बुधवारी रात्री आढळून आले. ऐन दिवाळीच्या सणालाही अंधाराचे साम्राज्य असल्याने या परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले असून, अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. दिवाळी सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण दिसत आहे. मात्र देहूरोड ते निगडी दरम्यान महामार्गावरील अनेक पथदिवे रस्त्याच्या रुंदीकरण कामामुळे बंद आहेत.
श्रीक्षेत्र देहूगाव येथे संत तुकाराममहाराजांच्या दर्शनासाठी येणाºया भाविकांमुळे व तळवडे आयटी पार्कमुळे सर्वाधिक वर्दळ असलेल्या देहूरोड ते झेंडेमळा या रस्त्यावरील अनेक दिवे बंद आहेत. चिंचोली, अशोकनगर, शितळानगर, गांधीनगर, शिवाजीनगर आदी भागात विविध ठिकाणी पथदिवे बंद असल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे दिवे उपलब्ध नसल्याने दिवे लागत नसल्याची माहिती मिळाली आहे. लष्करी हद्दीतील अशोकनगर ते झेंडेमळा मुख्य रस्त्यावर लहान मोठे असंख्य खड्डे पडले असल्याने रात्री खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचे अपघात होत आहेत.