पदपथावरील अतिक्रमण ठरतेय डोकेदुखी
By admin | Published: May 7, 2017 02:57 AM2017-05-07T02:57:07+5:302017-05-07T02:57:07+5:30
गुरुद्वारा चौक, आकुर्डी स्टेशन परिसर, बिजलीनगर आदी भागांतील पदपथ अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्येष्ठ
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : गुरुद्वारा चौक, आकुर्डी स्टेशन परिसर, बिजलीनगर आदी भागांतील पदपथ अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना भर रस्त्यातून चालावे लागत आहे. परिसराचा विकास करीत असताना पालिकेने लाखो रुपये खर्च करून सुसज्ज रस्ते निर्माण केले. रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक टाकून मोठे पदपथ तयार करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस याचा वापर नागरिक करत असताना दिसून आले; परंतु पदपथाच्या बाजूला असणाऱ्या विविध व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायातील विक्रीच्या वस्तू पदपथावर मांडण्यास सुरुवात केली.
हळूहळू पूर्णपणे अतिक्रमण करून पदपथ व्यापून टाकला तरी संबंधित विभागाने अशा व्यावसायिकांच्या विरोधात कडक कारवाई करून नागरिकांच्या वापरासाठी पदपथ मोकळे करावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
धर्मराज चौक ते भोंडवे कॉर्नर
धर्मराज चौक हा आकुर्डी रेल्वे स्टेशन लागतचा मुख्य चौक असून, या चौकातून रावेतमार्गे अनेक वाहने द्रुतगती मार्गाकडे ये-जा करण्याकरिता रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे येथे नेहमी वाहनांची गर्दी असते. याच मार्गावर शैक्षणिक संकुल असल्यामुळे येथे विद्यार्थ्यांची सतत गर्दी असते. डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलासमोर दोन्ही बाजूनी असणाऱ्या पदपथावर ज्यूस सेंटर, दूध विक्रेते, स्नॅक्स विक्रेते, फळ विक्रे ते, पंक्चर दुकान यांनी पूर्ण पदपथ व्यापला आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी अनेक शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरात सतत विद्यार्थी आणि नागरिकांची गर्दी असते.
व्यावसायिकांनी आपली दुकाने पदपथावर थाटल्यामुळे सर्वांना नाइलाजाने रस्त्यानेच जावे लागते. या मार्गावर सतत वाहनांची गर्दी असते. त्यामुळे अनेकवेळा या ठिकाणी किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे नागरिकांनी अनेकवेळा अशा व्यावसायिकांबद्दल तक्रारी करूनसुद्धा संबंधित प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेते. त्यामुळे या सर्व व्यावसायिकांचे फावते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुतर्फा असणाऱ्या पदपथांवर अनेक व्यावसायिकांनी आपली विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. त्यातच अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे नागरिकांना यामधून मार्ग शोधत जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. अनेक वेळा किरकोळ स्वरूपाचे अपघात घडले आहेत.
धर्मराज चौक ते भोंडवे कॉर्नर हा मार्ग नेहमी वाहनांच्या गर्दीने भरलेला असतो. जवळच महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची नेहमी वर्दळ असते. मार्गावरील दुतर्फा असणारे पदपथ वेगवेगळ्या व्यावसायिकांनी व्यापल्यामुळे रस्त्यावरून विद्यार्थ्यांना चालावे लागते. प्रशासनाने पदपथावरील अतिक्रमणाविरोधात व्यापक मोहीम राबविली पाहिजे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव विधाते यांनी केली.
गुरुद्वारा चौक
हा चौक नेहमी गजबजलेला असतो. चौकातून आकुर्डी रेल्वे स्टेशनकडे आणि वाल्हेकरवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक व्यावसायिक आपले हातगाडे उभे करून रस्ता अडवतात. यामध्ये प्रामुख्याने भाजी, आइस्क्रीम, ज्यूस, वडापाव विक्रे ते आदी व्यावसायिकांचा समावेश आहे. गुरुद्वारा परिसरात तर अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय चक्क रस्त्यावरच मांडतात. त्यामुळे सायंकाळी या ठिकाणी नेहमी वाहतूककोंडी होते. भाजी विक्रेत्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूस अतिक्रमण केल्यामुळे रस्ता कोठे आहे, याचा शोध वाहनचालक व नागरिकांना घ्यावा लागतो. गुरुद्वारा चौक ते वाल्हेकरवाडी हा मार्ग रस्ता दुभाजकामुळे अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्याच्या दुतर्फा हातगाडे उभे असतात. काही वेळा नागरिक या विक्रेत्यांना विनंती करण्यास गेल्यावर न ऐकता विक्रे ते नागरिकांसोबत हुज्जत घालतात.
स्पाईन रोड, बिजलीनगर
परिसरातील सर्वांत मोठा मार्ग म्हणून या मार्गाची ओळख आहे. या मार्गावर रेल विहार वसाहतीलगत असणाऱ्या मुख्य चौकात नेहमी नागरिक आणि वाहनांची गर्दी असते. येथून अनेक विद्यार्थी परिसरातील अनेक विद्यालयात जा-ये करीत असतात. बिजलीनगर येथील रेल विहार चौक ते ओम चौकापर्यंत दोन्ही बाजूनी भंगार, हॉटेल, गॅरेज, भाजी विक्रेते, कापड विक्रे ते, विविध हातगाडे आदींनी पदपथावर व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पदपथ नागरिकांसाठी की व्यावसायिकांसाठी असा प्रश्न नागरिकांना पडतो. या मार्गावर नेहमीच वाहनांची गर्दी असते. त्यामुळे परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना पदपथाऐवजी भर रस्त्याने जीव मुठीत घेऊन जावे लागते. चौकालगतच अनेकांनी आपले हातगाडे उभे केल्यामुळे वाहतुकीचा नेहमी खोळंबा होतो. पालिका प्रशासनाकडे तक्रार केल्यास अतिक्रमण विभाग काही काळापुरती कारवाई करते. मात्र, पुन्हा काही दिवसांनी ‘जैसे थे’ परिस्थिती पहावयास मिळते.