ठेकेदाराला मिळाली अखेर दिशा, स्थलदर्शक फलक बसविण्यास सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:30 AM2018-10-06T01:30:22+5:302018-10-06T01:30:49+5:30
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग : स्थलदर्शक फलक बसविण्यास केली सुरवात
देहूरोड : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे निगडी ते देहूरोड दरम्यानच्या दुपदरी रस्त्याचे चौपदरीकरण काम पूर्ण होत आहे. रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून महामार्गावर निगडी ते देहूरोड भागात रस्त्यालगत लावण्यात आलेले स्थलदर्शक फलक चुकीचे, अर्धवट असल्याने वाहनचालक व नागरिकांची दिशाभूल होत होती.
याबाबत लोकमतने छायाचित्रांसह सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून संबंधितांच्या निदर्शनास आणले होते. त्याची दखल घेत संबंधितांनी तातडीने सर्व
चुकीचे व अर्धवट दिशादर्शक फलक काढून टाकले होते. मात्र त्यानंतर एक महिना उलटूनही संबंधित ठिकाणी फलक लावण्यात आलेले नसल्याने लोकमतने पुन्हा सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याने याची दखल घेत संबंधितांनी दिशादर्शक फलक बसविण्यास सुरुवात केली आहे.
‘लोकमत’मध्ये महामार्गावरील दिशादर्शक फलक दिशाहीन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर (दि. ३१ जुलै) संबंधितांनी सर्व चुकीचे फलक काढले होते. त्या वेळी नवीन फलक लवकरच बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, एक महिना उलटला तरी फलक बसविण्यात आलेले नसल्याने निगडी ते देहूरोड रस्त्याच्या दुतर्फा इतर राष्ट्रीय महामार्गांवर लावण्यात आलेल्या स्थलदर्शक फलकांप्रमाणे फलक बसविणे गरजेचे होते.
मात्र याबाबत विलंब होत चालल्याने वाहनचालक व भाविकांची गैरसोय टाळण्याबाबत देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचाच्या वतीने अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे यांनीही रस्ते विकास महामंडळास निवेदन देऊन स्थलदर्शक फलक बसविण्याची मागणी केली होती.
लोकमतने ‘स्थलदर्शक फलक नसल्याने वाहनचालक होताहेत दिशाहीन; चुकीची दुरुस्ती कधी होणार?’ या शीर्षकाचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध (दि. ४ सप्टेंबर) केले होते. त्या वृत्ताची दखल घेत महामंडळाच्या संबंधित ठेकेदाराने चुकीच्या फलकांची दुरुस्ती करून नवीन फलक बनवून नुकतीच बसविण्यास सुरुवात केली असून, पहिल्या टप्प्यात श्रीक्षेत्र देहूगाव, देहूरोड येथील बुद्धविहार, देहूरोड बाजार, गार्डन सिटी, फिल्ड अॅम्युनिशियन डेपो आदी फलक बसविले असून लवकरच सर्व स्थलदर्शक फलक बसविण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.