सुरेल पर्वाचा अस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 03:20 AM2018-05-07T03:20:02+5:302018-05-07T03:20:02+5:30

मराठी भावसंगीतातील मैलाचा दगड म्हणजे शुक्रतारा मंदवारा... रसिकांच्या मनावर अधिराज्य केलेले हे भावगीत यंदा ५५ व्या वर्षात पदार्पण करीत होते. काळ बदलला, पिढ्या बदलल्या; पण तरीही प्रत्येकाला तू अशी जवळी राहा सांगायला शुक्रताऱ्याचा आधार हा लागतोच... मराठी भावसंगीताच्या आकाशात अढळ स्थान निर्माण केलेल्या या गीताला अमरत्व बहाल करणारे गायक अरुण दाते यांच्या आठवणींचा हा लेखाजोखा...

End of the one Journey | सुरेल पर्वाचा अस्त

सुरेल पर्वाचा अस्त

Next

ते वर्ष होत १९६३ चं... इंदूर रेडिओ स्टेशनवर एक तरुण गायक उर्दू गझल पेश करीत होता. इकडे मुंबई केंद्रावर श्रीनिवास खळे त्या गझलेला दाद देत होते आणि त्या तरुणाचं मराठमोळं नाव ऐकून ते अवाक् झाले. इतक्या नजाकतीने आणि माधुर्याने शब्दांना सुरांनी उलगडणारा हा गुणी गायक आपल्याला कसा माहीत नाही, असा प्रश्न त्यांना पडला होता.
नेमकं त्याचवेळी त्यांच्याकडे एक गाणं तयार होतं आणि त्यासाठीचा आवाज त्यांना या तरुणाच्या रुपाने मिळाला होता. पुढे या गाण्याने इतिहास रचला आणि मराठी संगीत क्षेत्राला मिळाला भावगीतांचा राजा... हे गाणं होतं ‘शुक्रतारा मंदवारा’ आणि गायक अर्थातच अरुण दाते.
दाते कुटुंब मूळ इंदूरचं... कलाकारांच्या कलेची कदर करणारे रामूभय्या दाते हे अरुणजींचे वडील. खळेंनी अनेक पत्रे पाठवूनही अरुण यांच्याकडून उत्तर येत नव्हते. शब्दांच्या उच्चारांबद्दल साशंकता असल्याने त्यांनी उत्तर देणे टाळले होते. अखेर खळे आणि यशवंत देव यांनी रामूभय्यांकडे तक्रार केली आणि त्यांनी अरुण यांना समजावले आणि उदयाला आला शुक्रतारा... हिंदी भाषेत बहुतांश गाणी गाणाºया सुधा मल्होत्रा यांनी त्या गाण्यात अरुण यांना साथ दिली. पुढे या जोडगोळीने हजारो कार्यक्रम एकत्र केले.
भारताबाहेर अरुण दाते स्थानिक गायिकांसोबत गाणे सादर करीत असत. त्यांना या गाण्यात साथ करणाºया गायिकांची संख्या सुमारे शंभरच्याही पुढे आहे.
गेले काही दिवस शारीरिक व्याधीमुळे त्यांचं गाणंही थांबलं होतं. त्यांची ही अत्तरकुपी त्यांचे पुत्र अतुल दाते जगभर दरवळत ठेवण्याचे काम करीत आहेत. ४ मे रोजी दातेंचा ८५ वा वाढदिवस पुण्यात साजरा करण्यात आला.
त्या वेळी दाते जास्त आजारी असल्याचं समजलं. अखेर आज दिवस उगवला तो या अरुणोदयाच्या मावळण्याचीच खबर घेऊन... अरुणजी आज नसले तरी त्यांचे स्वर श्रोत्यांच्या मनात कायम अढळ राहतील, यात शंका नाही !

पाठीवर शाबासकीची थाप
१९६८ च्या सुमारास मी अरुण दाते यांचे ‘शुक्रतारा मंदवारा’ हे गाणे ऐकले. त्या वेळी मी शाळेत होतो. हे गाणे खूप वेगळे असल्याचे त्या वेळी जाणवले. गाणे काय हे कळायला लागले, त्या वेळी या गाण्यातील विलक्षण ताकद जाणवली. अरुण दाते यांच्या आवाजाचा पोत भारदस्त आणि गोड होता. या जन्मावर, दिवस तुझे फुलायचे, स्वरगंगेच्या काठावरती, लतादीदींबरोबर गायलेले ‘संधिकाली या अशा’ अशा एकाहून एक सरस रचना त्यांनी अजरामर केल्या. संगीतकाराची चाल आणि कवीच्या शब्दांना त्यांनी कायमच पूर्ण न्याय दिला. वाशीला माझ्या एका गाण्याच्या कार्यक्रमात ते विंगेत बसले होते. माझे गाणे झाल्यावर त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली. एका कलाकाराने दुसºया कलाकाराला दिलेले हे प्रोत्साहन अनोखे होते.
- श्रीधर फडके, गायक

या जन्मावर... या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
अरुण दाते यांचा फार जवळून सहवास काही लाभला नाही. एका कार्यक्रमाच्यानिमित्ताने त्यांची भेट झाली होती. त्यानंतर त्यांचे आत्मचरित्र आणि भावगीतांच्या माध्यमातून भावगीतांचे वेगळे युग निर्माण करणाºया गायकाचा परिचय झाला. त्यांच्या वागण्यात खानदानी आदब होती. गाण्यावर प्रचंड प्रेम करणारा अशी त्यांची आणखी वेगळी ओळख सांगता येईल. त्यांना भाषेची उत्तम जाण होती. भावगीत गाताना शब्दांवर ज्या प्रकारची हुकूमत लागते ती त्यांच्याकडे होती. त्यांची शब्दफेक जबरदस्त होती. अर्थात हे सगळे त्यांना असलेल्या काव्य आणि साहित्याच्या आवडीमुळे होते. आमची पिढी त्यांचे गाणे ऐकून मोठी झाली. तसेच भावगीत गाणारी पिढी त्यांचे गाणे ऐकून घडली. नवोदित गायकांच्या गाण्यावर त्यांचे संस्कार दिसून येतात. - संदीप खरे, गायक, गीतकार



दिलखुलास मनाचा माणूस...
साधारण चार वर्षे शुक्रतारा कार्यक्रमाच्यानिमित्ताने अरुभय्या यांच्याबरोबर काम करता आले. कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे होती. अरुभय्या यांना उत्तम गाणी मिळाली. त्यांना रसिकवर्गाकडून प्रचंड प्रेम मिळाले. मी त्या वेळी पुण्यातील सदाशिव पेठेतील एका वाड्यात राहायचो. त्या वाड्यात एकदा ते आले होते. सहगायिका रंजना जोगळेकर, रमाकांत परांजपे, अजय घोंगडे, सचिन जांभेक र आदी वाद्यवृंद त्यांच्यासमवेत होता. आम्ही एकत्र जेवण केले. खूप संस्मरणीय प्रसंग होता तो. पुढे कोल्हापूर, मुंबई, नगर, नाशिक, पुणे, पिंपरी येथे कार्यक्रमांचे दौरे झाले. नगरला कार्यक्रमाच्या निमित्ताने असताना कापड खरेदीला जाण्याचा योग आला. अरुभय्या हे मूळचे टेक्स्टाइल्स इंजिनिअर. त्यामुळे त्यांना कपड्यांची बारीक पारख. आम्हाला त्या वेळी उत्तम प्रतीचे कपडे घेण्यात त्यांनी मदत केली. अतिशय दिलखुलास माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करता येईल. त्यांच्यासंदर्भात दुसरी एक आठवण अशी, की पुण्यात ज्या वेळी बालगंधर्व किंवा टिळक स्मारक येथे ते कार्यक्रमासाठी येत. कार्यक्रमानंतर जेवण्याकरिता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या घरी जात. हृदयनाथ आणि त्यांचे ऋणानुबंध. अशा वेळी हृदयनाथ यांच्या पत्नी भारतीताई जेवणाचा छान बेत करायच्या.
- शिरीष रायरीकर, शुक्रतारा कार्यक्रमाचे व्यवस्थापक

गाण्याबरोबर साहित्यावरही बोलायचे...
अरुण दाते त्यांच्यासोबत काम करताना प्रत्येक कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी आनंदयात्रा असायची. ते कार्यक्रम करण्याविषयी अतिशय गंभीर असायचे. बाहेरगावी गेल्यावर संध्याकाळी कार्यक्रम असेल तर ते दुपारीही बाहेर जाताना अडवायचे. कार्यक्रम झाल्यावर फिरायला जा, मात्र आपण आलेलो आहोत तो कार्यक्रम करायला त्याचे प्राधान्य असायचे. मला आजही आमचा नाशिकचा गोदावरीच्या तीरावर झालेला कार्यक्रम आठवतो. रात्री सुरू झालेला कार्यक्रम, बाजूला वाहणारे शांत नदीपात्र, त्यावर तरंगत येणारे दिवे आणि पहाटेपर्यंत दातेसाहेबांनी श्रोत्यांवर केलेला स्वरांचा वर्षाव कधीही विसरता येणार नाही. त्यांची गायकी शब्दप्रधान होती. शब्दांतून भाव पोहोचवण्याबाबत ते खूप काटेकोर होते. विशेषत: पाडगावकर आणि त्यांची जोडी विशेष जमायची. त्या दोघांचा संवाद अगदी ऐकत राहावा वाटायचा. त्यांच्या स्वरात इतकी ताकद असायची, की आम्हीसुद्धा रंगमंचावर अनेकदा अश्रुत भिजत असू. एकदा आम्हाला करकंब नावाच्या गावाला कार्यक्रम होता. पण प्रवासाचा शीण अजिबात न जाणवू देता दातेसाहेबांनी गाणे सादर केले, काहीही झालं तरी त्याचा परिणाम गाण्यावर न होऊ देण्याचे त्यांचे कौशल्य विलक्षण होते. - स्वाती पाटणकर, निवेदिका

प्रत्येक चाहत्याविषयी होती आत्मीयता
मी त्यांच्या मुलासोबतच्या कार्यक्रमात निवेदन करीत असे.तिथे त्यांनी माझं निवेदन ऐकलं आणि मी त्यांच्या कार्यक्रमाशी जोडले गेले. रात्रभर मुंबई ते सोलापूर प्रवास करूनही एकदा ते तितक्याच जिंदादिल पद्धतीने गायल्याचे अजूनही स्मरणात आहे. कलाकार म्हणून तर ते श्रेष्ठ होतेच; पण माणूस म्हणून केवळ अफलातून होते. कधीही कोणाला नाव ठेवणं तर नाहीच; पण नव्या गायकांचेही त्यांना खूप कौतुक असायचे. कदाचित त्यामुळेच मंदार आपटे, श्रीरंग भावेंसारखे नवे गायक त्यांच्यासमोर दडपण न घेता गाऊ शकायचे. दातेसाहेबांचे माणूसपण इतके मोठे होते, की त्यांचे चाहते असलेल्या एखाद्या मंत्र्यापासून ते आपल्या ड्रायव्हरपर्यंत ते तितक्याच आत्मीयतेने वागायचे. पोलिसांपासून ते चहावाल्यापर्यंत कुठेही चाहते भेटायचे आणि दातेसाहेब त्यांना तितक्याच आत्मीयतेने भेटायचे. - धनश्री लेले, निवेदिका

माझ्या पहिल्या अल्बमचे प्रकाशन त्यांच्या हस्ते - सलील कुलकर्णी

‘तरीही वसंत फुलतो’ या माझ्या पहिल्या अल्बमचे प्रकाशन अरुण दाते यांच्या हस्ते झाले होते. ‘मला स्वत:चे काम घेऊन लोकांसमोर घेऊन येणारे कलाकार आवडतात,’ अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आमचा सांगीतिक परिचय अधिकाधिक दृढ होत गेला. आपले स्वत:चे युग निर्माण करणारे मोजके लोक असतात. त्यांच्यापैकीच एक म्हणजे अरुण दाते. प्रत्येक घरात आपले गाणे वाजणे, रसिकांच्या मनात रुजणे हीच कलाकारांसाठी लोकप्रियतेची पावती असते. स्वभावातला नितळपणा त्यांच्या गाण्यात उतरायचा. अरुण दाते मी कधीही वैतागलेले, दुर्मखलेले, थकलेले पाहिले नाहीत. ते कायम प्रसन्न आणि सकारात्मक असायचे. आपला काळ संपल्यावर काहीच घडत नाही, असेच प्रत्येक कलाकाराला वाटते. परंतु, अरुण दातेंनी उमद्या मनाने नवीन कलाकारांचे कायम कौतुक केले. कलाकार तसेच रसिक म्हणूनही ते तितकेच प्रामाणिक होते. चांगले काव्य, गेयता याची देणगी त्यांना घरातूनच मिळाली. अशा दिग्गज व्यक्तीचे केवळ असणेही उभारी देणारे ठरते. अरुण दाते चार-पाच वर्षांपूर्वी पुण्यात राहायला आले होते. पत्नी गेल्यावर ते खूप खचले होते, हळवे झाले होते. अरुण दाते यांना अनेकदा हिंदी गाण्यांसाठी विचारणा झाली होती, मात्र ते मराठी भावसंगीताकडे वळले.

संकलन : प्रज्ञा केळकर-सिंग, नेहा सराफ, युगंधर ताजणे.

Web Title: End of the one Journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.