माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

By प्रकाश गायकर | Published: May 22, 2024 06:46 PM2024-05-22T18:46:16+5:302024-05-22T18:47:50+5:30

सासरच्यांनी व खासकरून माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिल्याने मी बारावीची परीक्षा देऊ शकले

Ended education in the circumstances of domestic situation completed by in-laws passed 12th | माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

माहेरी हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण सुटलं, सासरच्यांनी पूर्ण केलं, बारावीत उत्तीर्ण

पिंपरी : नांदेड जिल्ह्यातील छाया पवार यांची घरची परिस्थिती हलाखीची होती. त्यामुळे त्यांना बारावीचे शिक्षण पूर्ण करता आले नाही. परिस्थितीने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या छाया यांचा २०१६ ला विवाह झाला. पती राजू कांबळे यांनी छाया यांच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्याचे ठरवले. छाया यांनीही पतीला साथ देत बारावीमध्ये ६०.८३ टक्के गुण घेत यश मिळवले.

छाया पवार यांना स्पर्धा परीक्षा करण्याचे स्वप्न आहे. मात्र, माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना मध्येच शिक्षण सोडावे लागले. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी २०१६ मध्ये त्यांचा विवाह नांदेड येथील चिखली गावातील राजू माणिकराव कांबळे यांच्यासोबत २०१६ मध्ये लावून दिला. राजू पिंपरी चिंचवड शहरातील निगडीमध्ये बांधकाम साईटवर काम करतात. आपल्या पत्नीला आर्थिक परिस्थितीमुळे शिकता आले नाही, याची जाणिव त्यांना होती. त्यामुळे त्यांनी पत्नीला शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चिंचवड येथील गेंदीबाई चाराचंद चोपडा महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेऊन दिला. छाया आणि राजू यांना एक सहा वर्षांची मुलगी आहे. ती पहिलीमध्ये शिक्षण घेते.

दररोज सकाळी लवकर उठून छाया घरातील कामे आवरायच्या. त्यानंतर मुलीला शाळेत सोडून स्वत: महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जायच्या. परिस्थितीने शिक्षण हिरावलेल्या छाया यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवण्याचा निर्धार केला होता. त्यासाठी त्यांनी मेहनत घेऊन अभ्यास केला. गावाकडे असलेल्या सासू-सासऱ्यांनी देखील त्यांना पाठिंबा दिला. त्या जोरावर त्यांनी बारावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवले आहे. छाया यांना ६०.८३ टक्के गुण मिळाले आहे. घरातील कामे, मुलीचे शिक्षण सांभाळून त्यांनी हे यश मिळवल्याने त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. पुढे पदवीचे शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देऊन सरकारी नोकरी करण्याचे छाया यांचे स्वप्न आहे.

मला माझ्या माहेरच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेता आले नाही. मात्र, सासरच्यांनी व खासकरून माझ्या पतीने मला शिक्षण घेण्यासाठी पाठिंबा दिला. त्यामुळे मी बारावीची परीक्षा देऊ शकले. घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मला चांगले गुण मिळवता आले. - छाया पवार-कांबळे.

Web Title: Ended education in the circumstances of domestic situation completed by in-laws passed 12th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.