ऊर्जा बचतीचा ‘स्वीडन’शी करार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:27 AM2018-05-11T03:27:14+5:302018-05-11T03:27:14+5:30
महापालिकेच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न सुरू केले असून, ऊर्जा बचत आणि संवर्धन, वापर यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी स्वीडन यांच्यासमवेत करार केला आहे.
पिंपरी : महापालिकेच्या वतीने ऊर्जा बचतीसाठी प्रयत्न सुरू केले असून, ऊर्जा बचत आणि संवर्धन, वापर यासाठी महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी स्वीडन यांच्यासमवेत करार केला आहे. करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या झाल्या. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून निर्माण होणाºया ऊर्जेचा उपयोग कुलिंगसाठी केला जाणार आहे. महापालिकेच्या वतीने साकारण्यात येणारा हा देशातील पहिला प्रकल्प असणार आहे.
शहरात स्मार्ट सिटी योजनेची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहेत. पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटची कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर परिसरात एरियाबेस डेव्हलपमेंटची कामे सुरू झाली आहेत. स्मार्ट सार्वजनिक वाहतूक, आरोग्य, सिग्नल व्यवस्था केली जात आहे. आता ऊर्जा बचतीसाठीही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटी स्वीडन समवेत सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पासाठी महापालिका कोणताही आर्थिक भार उचलणार नाही. आंतरराष्टÑीय कंपन्यांच्या मदतीने हा प्रकल्प साकारला जाणार आहे. पाश्चात्य देशात सेंट्रालाईज कुलिंग यंत्रणा आहे. हे तंत्रज्ञान आपल्याकडे आणून डिस्ट्रिक कुलिंग प्रोजेक्ट उभारला जाणार आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘स्वीडन, दुबई, दोहा, मकाऊ, जर्मनी, नार्वे, अमेरिकन देशांमध्ये सेंट्रालाईज हिटिंग सिस्टीम आणि कुलिंग सिस्टीम असते. त्याचप्रमाणे वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात तयार होणारी ऊर्जा ही कुलिंगसाठी वापरणार आहे. ’’
प्रकल्पासाठी ७० कोटींचा खर्च
स्वीडनमधील एईके अर्थात स्मार्ट सिटी स्वीडन आणि टीएफजी अर्थात टेक्निक फॉर गार्डन या संस्थेबरोबर करार केला आहे. संबंधित संस्था ही स्वीडनची शासकीय आहे. महिनाभरात या संदर्भातील डीपीआर तयार केला जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. ऊर्जा बचत आणि ऊर्जेचे संवर्धन असे दोन्हीही उद्देश साध्य होणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे सत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, हा खर्च संबंधित संस्था करणार आहे.