प्रियकराने प्रेयसीसाठी दिला बायकोला घटस्फोट अन् घडलं असं काही की त्यानं संपवलं आयुष्य...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 03:36 PM2022-04-05T15:36:32+5:302022-04-05T15:54:22+5:30
प्रेयसीच्या विरोधात गुन्हा दाखल...
पिंपरी : इंजिनियर असलेल्या तरुणाला महाविद्यालयातील प्रेयसी लग्नानंतर अचानक भेटली. त्यानंतर त्यांच्यातील जुने प्रेम पुन्हा बहरले. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर प्रेयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी प्रेयसीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आत्महत्या केलेल्या ३५ वर्षीय इंजिनियर तरुणाच्या ६४ वर्षीय वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना महाविद्यालायातील एका तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. मात्र महाविद्यालयीन शिक्षणानंतर तरुण आणि त्याची प्रेयसी यांची ताटातूट झाली. दरम्यान, इंजिनयरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणाला नोकरी लागली. त्याचे लग्न झाले. त्याला अपत्य प्राप्तीही झाली. सारेकाही सुरळीत असताना त्याची आणि महाविद्यालयीन प्रेयसी असलेल्या तरुणीची अचानक भेट झाली. त्याच्या प्रेयसीचेही लग्न झाले होते. तसेच ती प्रेयसी एका बाळाची आई देखील झाली असल्याचे तरुणाला समजले. मात्र तरीही जुन्या प्रेमाने उचल खाल्ली.
तरुण इंजिनियर आणि त्याची प्रेयसी यांच्यातील ‘प्रेम’ पुन्हा बहरले. मात्र दोघांचेही लग्न झाल्याने त्यांना त्याचा अडसर वाटत होता. दोघांनी लग्न करायचे ठरवले. त्यासाठी तरुणाने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या प्रेयसीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे ठरले. त्यानुसार तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र त्याच्या प्रेयसीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणाचा भ्रमनिरास झाला. प्रेयसी प्रतिसाद देत नसून आपल्याला त्रास देत आहे, आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही, असे एका चिठ्ठित लिहून इंजिनियर तरुणाने १३ डिसेंबर २०२१ रोजी हिंजवडी येथे राहत्या घराच्या फॅनला बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ४ एप्रिलला याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी तरुणीला दीड वर्षांची मुलगी आहे.