दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून इंजिनिअर तरुणीचा खून; प्रियकर तरुणाला अटक

By नारायण बडगुजर | Published: January 29, 2024 08:32 PM2024-01-29T20:32:02+5:302024-01-29T20:32:19+5:30

पाच गोळ्या झाडल्याचे शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न

Engineer girl killed on suspicion of falling in love with someone else; | दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून इंजिनिअर तरुणीचा खून; प्रियकर तरुणाला अटक

दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याच्या संशयातून इंजिनिअर तरुणीचा खून; प्रियकर तरुणाला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी :
प्रेयसी दुसऱ्याच्या प्रेमात पडली असावी, या संशयातून हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या इंजिनिअर तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली. प्रियकराने पाच गोळ्या झाडून प्रेयसीचा खून केल्याचेही मृत तरुणीच्या शवविच्छेदन अहवालातून निष्पन्न झाले. 

वंदना के. द्विवेदी (२६) असे खून झालेल्या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ पांचाळ यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, ऋषभ राजेश निगम (रा. लखनऊ) याला पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदना आणि ऋषभ हे महाविद्यालयात असताना एकमेकांच्या प्रेमात पडले. वंदना हिंजवडीतील कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करीत होती. कंपनीच्या जवळच एका पीजी हॉस्टेलमध्ये राहत होती. ऋषभ हा लखनऊमध्ये ब्रोकरचे काम करत होता. दोघेही फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते. पण वंदना अपेक्षित संवाद करत नसल्याचे ऋषभला वाटत होते. त्यातून ती अन्य कोणाच्या तरी प्रेमात पडल्याचा संशय त्याला होता. त्यावरून त्यांच्यात वाद सुरू होते. ऋषभने एका मित्राकडून पिस्तूल घेतले होते. संशय वाढत असल्याने ऋषभ २५ जानेवारीला लखनऊ येथून हिंजवडीत आला. ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये तो थांबला. वंदना २६ जानेवारीला सायंकाळी लॉजमध्ये ऋषभला भेटली. भेटून ती पुन्हा हॉस्टेलमध्ये परतली. ऋषभने दुसर्‍या दिवशी वंदनाला पुन्हा बोलावून घेतले. दोघांनी एकत्र खरेदी केली, सोबत जेवणही केले. २७ जानेवारीला दिवसभर दोघेही एकत्र होते. रात्री साडेनऊच्या सुमारास दोघेही लॉजच्या खोलीत असताना ऋषभने वंदनावर गोळ्या झाडल्या. 

पाच दिवसांची पोलिस कोठडी

हिंजवडी पोलिसांनी ऋषभला सोमवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. गुन्ह्यातील शस्त्र जप्त करणे, ऋषभची वैद्यकीय तपासणी करणे आणि गुन्ह्यामागील हेतू शोधणे यासाठी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला तीन फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

 ऋषभ निगम याने प्रेमप्रकरण आणि संशयातून वंदनाचा खून केला असल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. घटनेबाबत सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

- सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त तथा जनसंपर्क अधिकारी

Web Title: Engineer girl killed on suspicion of falling in love with someone else;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.