नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणे अभियंत्याला पडले महागात; महापौरांनी दिले निलंबनाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:31 AM2020-08-22T11:31:44+5:302020-08-22T11:32:48+5:30
नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे...
पिंपरी : नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे. कॉल रेकॉर्ड करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला तत्काळ निलंबित करा, असा आदेश महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना शुक्रवारी दिला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुलै आणि आॅगस्ट महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. महापौर उषा ढोरे अध्यस्थानी होत्या.
सभेच्या सुरुवातीला संत तुकारामनगर प्रभागातील नगरसेविका सुजाता पालांडे यांनी एक अनुभव सांगितला. प्रभागातील कामे होत नाहीत. अधिकारी कामाला टाळाटाळ करतात. कामांसाठी कनिष्ठ अभियंत्याला फोन केला असता अभियंत्याने कॉल रेकॉर्ड केला. तो कॉल प्रभागातील दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवला, असे कृत्य करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली.
नगरसेविका आशा शेंडगे यांनीही अनुभव विशद केला. दापोडी प्रभागात विकासकामे सुरू आहेत. त्याची कोणतीही माहिती स्थानिक नगरसेवकांना दिली जात नाही. ठेकेदाराकडून दादागिरीची भाषा केली जाते. अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करा, अशी मागणी केली. तर, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना द्या, अशी सूचना महापौरांना केली.
महापौर ढोरे म्हणाल्या, ‘‘नगरसेवक हा वॉर्डातील मंत्री असतो. त्याच्यावर प्रभागाची संपूर्ण जबाबदारी असते. नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करून दुसऱ्या नगरसेवकाला ऐकवणे चुकीचे आहे. नगरसेविकेचा कॉल रेकॉर्ड करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याला आयुक्तांनी तत्काळ निलंबित करावे.’’