दापोडीतील अपघातप्रकरणी द्विसदस्यीय समितीकडून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 08:14 PM2019-12-10T20:14:55+5:302019-12-10T20:20:59+5:30
प्रशासनाने पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस दिली असून जबाबदार ठेकदारावर गुन्हा दाखल
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील पाण्याच्या टाकीजवळ रविवारी ड्रेनेजची वाहिनी टाकण्याचे काम करताना दुर्घटना होऊन दोन जण ठार झाले. अपघात प्रकरणी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी द्विसदस्सीय समिती नियुक्त केली आहे. अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अमृतयोजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण व्यवस्था व प्रकल्प राबविण्याचे काम दापोडीत सुरू असताना अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये वाचवायला गेलेल्या अग्निशामक विभागातील कर्मचारी विशाल जाधव यांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी सुटीच्या दिवशी काम करण्याबाबत महापालिका अधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चरला नोटीस दिली असून जबाबदार ठेकदारावर गुन्हा दाखल केला आहे. निविदेतील अटी, शर्तीमध्ये स्पष्टपणे सुटीचे दिवशी ठेकेदाराने काम करू नये, असे असताना ही ठेकेदाराने सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी कामगारांना बोलविले आहे. काम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती, असे महापालिका अधिकाºयांचे मत होते.
अपघात प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी द्विसदस्यीय समिती स्थापन केली असून शहर अभियंता राजन पाटील आणि कार्यकारी अभियंता श्रीकांत सवने यांचा समावेश आहे. समितीला चौकशीसाठी आठवड्याचा कालावधी देण्यात आला आहे. आयुक्त म्हणाले, दापोडीत अपघात प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन जणांची समिती नियुक्त केली आहे. ठेकेदारांवर गुन्हाही दाखल केला आहे. या प्रकरणात अधिकाºयांची भूमिका, जबाबदारी, सल्लागाराची भूमिका याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तसेच अधिकाºयांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. आठवड्यात चौकशी पूर्ण होऊन अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार आहे.