मावळात मतदारांचा उत्साह! कोण शिकागो टू पिंपरी तर कोण लंडन ते थेरगाव, बजावला मतदानाचा हक्क
By नारायण बडगुजर | Published: May 13, 2024 06:59 PM2024-05-13T18:59:48+5:302024-05-13T19:00:47+5:30
पिंपरीगाव येथील कार्तिक हनुमंत वाघेरे या २२ वर्षीय तरुणाने दीड लाख रुपये खर्च करून शिकागो येथून येऊन मतदान केले...
पिंपरी : लोकसभा निवडणुकीसाठी काही मतदार लाखो रुपये खर्च करून परदेशातून आले. त्यांनी सोमवारी (दि. १३) मतदान केले. पिंपरीगाव येथील कार्तिक हनुमंत वाघेरे या २२ वर्षीय तरुणाने दीड लाख रुपये खर्च करून शिकागो येथून येऊन मतदान केले.
लोकसभेच्या मावळ मतदारसंघासाठी सोमवारी मतदान झाले. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे संजोग वाघेरे-पाटील यांच्यात मुख्य लढत झाली. यात दोन्ही उमेदवारांनी गोतावळ्याला मतदानाचे आवाहन केले. त्यात वाघेरे-पाटील यांचा पुतण्या तर उद्योजक हनुमंत वाघेरे यांचा मुलगा कार्तिक शिकागो येथून मतदानासाठी पिंपरीत आला. तो शिकागोत पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याने आठवडाभरापूर्वी विमानाचे तिकीट घेतले. शिकागो येथून दिल्ली आणि तेथून पुन्हा विमानाने पुणे असा २० तासांचा प्रवास करत तो शनिवारी पिंपरीत पोहोचला.
तो म्हणाला, ‘‘मतदान प्रक्रियेबाबत सर्वांनी जागरूक असावे. सर्वांनी मतदान केले पाहिजे. आपल्या व देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे जगात कुठेही असलो तरी मतदानासाठी आलेच पाहिजे.’’
लंडनवरून आले पिंपरीत
पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदा तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे पुत्र डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आई-वडिलांसह थेरगाव येथील एम. एम. हायस्कूलमध्ये मतदान केले. डॉ. किरण तुळसे सहा वर्षांपासून लंडन येथे स्थायिक आहेत. आई, वडिलांचा सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आगामी काळात काम करू. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मतदान करणे ही राष्ट्रीय जबाबदारी आहे. त्यामुळे मी आवर्जून लंडन येथून मतदानासाठी आलो, असे डॉ. किरण यांनी सांगितले.