पिंपरी-चिंचवड शहरात ट्रॅव्हल्स बस, अवजड वाहनांना प्रवेश बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 07:36 AM2022-10-22T07:36:44+5:302022-10-22T07:39:16+5:30
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी शुक्रवारी याबाबत आदेश दिले आहेत....
पिंपरी : खासगी ट्रॅव्हल्स बसमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी दापोडी येथून खडकीकडे जाणाऱ्या मार्गावर या बसेसला प्रवेश बंदी करण्यात आली आहे. संबंधित ट्रॅव्हल्स बसेस, अवजड वाहनांना २१ आक्टोबरपासून सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत प्रवेश बंदी केली आहे. या ट्रॅव्हल्स बस आणि अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी शुक्रवारी याबाबत आदेश दिले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून पुण्याकडे जाणाऱ्या बहुतांश खासगी ट्रॅव्हल्स बस दापाेडी येथून हॅरिस पुलावरून जातात. दररोज सायंकाळी गर्दीच्या वेळेत या बस जातात. त्यामुळे खडकी रेल्वे ट्रॅक येथे वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूक कोंडी होते. या कोंडीत अडकलेल्या वाहनांच्या दापाेडीपर्यंत रांगा लागतात. त्यामुळे ही कोंडीची समस्या सोडविण्यासाठी आदेश काढण्यात आला. त्यानुसार भोसरी, दिघी, आळंदी, सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतून नाशिक फाटा मार्गे खडकीकडे जाणाऱ्या ट्रव्हल्स बसेस व अवजड वाहनांना दापोडी येथील हॅरिस पूलमार्गे खडकी व पुण्याकडे जाण्यास प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
पिंपरी येथून खडकीकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस या नाशिक फाटा येथून डावीकडे वळून सीआयआररटी गेट येथून ‘यू टर्न’ घेऊन नाशिक फाटा उड्डाणपूल मार्गे म्हसोबा चौक, कोकणे चौक, जगताप डेअरी चौकाकडून डावीकडे वळून औंध रस्त्याने इच्छित स्थळी जातील. तसेच नाशिक फाटा येथून डावीकडे वळून भोसरी येथील उड्डाण पुलावरून जयगणेश साम्राज्य चौक (पांजरपोळ चौक) येथून उजवीकडे वळून अलंकापुरम सोसायटी पुढे तापकीर चौकातून उजवीकडे वळून दिघी -विश्रांतवाडी मार्गे इच्छित स्थळी जातील.