पर्यावरण दिन कि दीन ? औद्योगिकरणाच्या नावाखाली टेकड्यांची लचकेतोड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 08:49 PM2018-06-04T20:49:56+5:302018-06-04T20:49:56+5:30
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे हजारो हेक्टर वर वृक्षारोपण करणाऱ्या संस्था तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे.
- हनुमंत देवकर
चाकण - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एकीकडे हजारो हेक्टर वर वृक्षारोपण करणाऱ्या संस्था तर दुसरीकडे टेकड्या जमीनदोस्त करून उभे राहणारे उद्योग कारखाने हा विरोधाभास पाहायला मिळत आहे. टेकड्यांचे संरक्षण करण्या ऐवजी लचके तोडण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे चित्र चाकण औद्योगिक परिसरात पहावयास मिळत आहे. चार वर्षांपूर्वी माळीन सारखी मोठी दुर्घटना घडल्या नंतरही प्रशासन याकडे काना डोळा करीत आहे. डोंगर टेकड्या फोडून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी करणारे व टेकड्यांचे सौंदर्य नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी निसर्ग व पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. औद्योगिक कंपन्या मोठ्या प्रमाणावर केमिकल उघड्यावर सोडून प्रदूषण करीत आहेत. तसेच पिंपरी चिंचवड मधील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी नदीला सोडल्याने नदी प्रदूषित होऊन नदीला बाराही महिने जलपर्णीचा वेढा पडत आहे. काही दिवसांनी प्रदूषणापासून वाचवा रे वाचवा अशी माणसावर वेळ येणार आहे.
चाकण औद्योगिक परिसरातील खराबवाडी, वाघजाईनगर, कडाचीवाडी, महाळुंगे इंगळे, कुरुळी, निघोजे, वराळे, कोरेगाव खुर्द, भांबोली, वाकी, रासे,चिंबळी,केळगाव या गावांमध्ये अनधिकृत पणे टेकड्या फोडून मुरूम व डबर या गौण खनिजाचे उत्खनन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. डोंगर टेकड्या फोडून उद्योजकांनी अक्षरश: कपारीमध्ये कारखाने उभे केले आहेत. याकडे महसुल विभागाचे दुर्लक्ष्य झाले असून अशा ठिकाणी संबंधित खात्यांनी बांधकाम परवानगी दिली कशी? असा प्रश्न नागरिकांपुढे उभा आहे .
कुरुळी येथे चक्क पुणे - नासिक महामार्गालगत एवढा मोठा डोंगर भुइसपाट होत असताना प्रशासनाचे लोक या महामार्गावरून प्रवास करताना या गोष्टी कडे कसा काना डोळा करतात, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. याच डोंगराच्या पायथ्याला अनेकांनी हाय वे लगत डोंगर पोखरून बांधकामे केली आहेत. वाघजाई नगर येथील डोंगर मधोमध फोडून त्यावर बांधकाम केले आहे. या डोंगरावर दत्ताचे मंदिर असल्याने दोन्ही बाजूंनी डोंगर पोखरून मध्यभागी चिंचोळ्या भिंतीवर मंदिर उभे आहे. खराबवाडीच्या डोंगरावर महादेवाचे मंदिर, निघोजे येथील डोंगरावर पार्वती मंदिर असल्याने हे डोंगर अर्धे शिल्लक आहेत. अन्यथा हे डोंगर संपूर्ण भुईसपाट झाले असते.
महाळुंगे व वाघजाई नगर येथे उद्योजकांनी डोंगर पोखरून त्यात कारखाने उभे केले आहेत. महाळुंगे व खराबवाडी हद्दीवरील महादेवाच्या डोंगरावरून अतिउच्च दाबाची वीज वाहिनी गेली असून तिचा विजेचा टॉवर डोंगर वर टाकला आहे . व पायथ्याला एका उद्योजकाने डोंगर पोखरून जागा भूईसपाट करून त्यात कारखाना उभारला आहे. वाघजाई नगर येथेही उद्योजकांनी टेकडी फोडून त्यातील गौण खनिज काढून कपारी मध्ये कारखाना बांधला आहे. डोंगर कपारीत बांधलेल्या अशा बांधकामांना केंव्हाही नैसर्गिक आपत्तीचा धोका होवू शकतो.
ज्या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांनी अध्यात्माचे धडे गिरवून तप साधना केली, त्या अध्यात्मिक भूमीत भामचंद्र डोंगरही सुरक्षित राहिलेला नाही. डोंगराच्या पायथ्याला खासगी जागा मालकांकडून डोंगर पोखरला आहे. पश्चिम महाराष्ट्र औद्योगिक वसाहती लगत खराबवाडी गावच्या हद्दीतील गायरानातील शासकीय मालकीचा डोंगर डबर मालकांनी गेल्या ३० वर्षान पासून १५० ते २०० फूट खोल खोदून डबराचि अवैध विक्री करून डोंगर गिळंकृत केला आहे.
त्यात परिसरातील गावांनी कचरा टाकून मोठा कचरा डेपो बनविला आहे. त्यामुळे दगड खाणीतील पाणी दूषित होऊन ते पाणी लगतच्या विहिरींना व बोअरवेल ला झिरपून जात आहे. शिवाय मोठ्या प्रमाणावर कचरा जाळून वायू प्रदूषण केले जात आहे. या कचऱ्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निघोजेगावच्या हद्दीत एका बहुराष्ट्रीय कंपनीने पार्वतीचा डोंगर फोडून त्यात पाण्याची टाकी बांधली आहे. वराळे येथे डोंगर फोडून खडी क्रशरचा व्यवसाय सुरु करण्यात आला असून कोरेगाव खुर्द येथे घाटाजवळ टेकडी फोडून सातत्याने मुरूम विक्री चालू आहे. तसेच एचपी कंपनी ते ह्युंदाई कंपनी या रोड वर उद्योजकांनी टेकड्या भुईसपाट केल्या आहेत. तरीही महसुल खाते याकडे दुर्लक्ष करीत आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाह, तर माळीन सारखी पुनरावूर्त्ती पहावयास मिळेल यात शंका नाही.
ज्या ज्या ठिकाणी डोंगर अद्याप भुसपाट झाले नाहीत त्या ठिकाणी प्रशासनाने व स्वयंसेवी संघटनांनी वृक्षारोपण करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींकडून होत आहे. तसेच टेकड्या नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.