पिंपरी महापालिकेचा पर्यावरण अहवालच आजारी; कोरोना झालाच नाही, हृदयविकारामुळे एकाचाही मृत्यू नाही
By तेजस टवलारकर | Published: August 12, 2022 12:55 PM2022-08-12T12:55:46+5:302022-08-12T12:55:53+5:30
महापालिका पर्यावरण अहवालात शहरातील आजार आणि रुग्णसंख्येची माहिती लपवत असल्याचे दिसते
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना झालाच नाही, एवढेच नव्हे तर हृदयविकारामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही, दोन वर्षांत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नाही, तर गेल्यावर्षी कर्करोगाचे १५ व यावर्षी १० रुग्ण आहेत, हे वाचले की एकादी बोधकथा वाटेल; पण थांबा हे सत्य आहे. महापालिकेने पर्यावरण अहवालात तसे नमूद केले आहे. त्यामुळे या अहवालच आजारी पडला आणि त्यावर उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनामुळे अडीच वर्षांत शहरातील ४६२७ नागरिकांचा मृत्यू झाला, तर शहरातील ३,६८,६४६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. परंतु, महापालिकेच्या पर्यावरण अहवालात ही माहिती दिली नाही. तसेच शहरात २०२०-२१ मध्ये मलेरियाचे ४ रुग्ण आढळले, तर २०२१-२२ मध्ये ११ रुग्ण आढळून आले. कावीळचे ४, टायफाईडच्या १५ रुग्णांची नोंद २०२१-२२ मध्ये झाली आहे. यावरून महापालिका पर्यावरण अहवालात शहरातील आजार आणि रुग्णसंख्येची माहिती लपवत असल्याचे दिसते.
जठराचा आणि आतड्यांचा दाह या आजाराच्या एकाही रुग्णाची दोन वर्षांत नोंद नाही. त्याचबरोबर दोन वर्षांत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण नाही. मेंदूच्या आजारांच्या रुग्णांची देखील दोन वर्षांत नोंद झालेली नाही. २०२१-२२ मध्ये डेंग्यूच्या ३३० रुग्णांची नोंद झाली, तर यातील ३ रुग्णांचा मृत्यू झाला.
शहरात २०२०-२१ मध्ये ३६०४ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला, तर २०२१-२२ मध्ये ४२२८ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. परंतु, यामध्ये कोरोनामुळे शहरातील किती नागरिकांचा मृत्यू झाला याची माहिती नाही. कोरोना काळात महापालिका हद्दीबाहेरील अनेक रुग्ण शहरात उपचार घेण्यासाठी दाखल होते. यातील काही रुग्णांचा शहरातील रुग्णालयात मृत्यू झाला होता. परंतु, अशा रुग्णांची माहिती दिली नाही. दरवर्षी पर्यावरण अहवाल काढावा लागतो, म्हणून यंदाचा अहवाल काढला असल्याचे यावरून दिसून येते.
हृदयविकारामुळे एकाचाही मृत्यू नाही ?
शहरात २०२०-२१ मध्ये ११५ जणांना हृदयविकाराचा झटका आला, तर २०२१-२२ मध्ये १८ जणांना हृद्यविकाराचा झटका आला आहे. परंतु, हृदयविकाराने झटक्यामुळे दोन वर्षांत एकाही नागरिकांचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती पर्यावरण अहवालात म्हटले आहे.