चिंचवड रेल्वे स्थानकावर ‘एस्केलेटर’; तिकिटासाठी स्वतंत्र खिडकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 05:55 AM2018-06-06T05:55:17+5:302018-06-06T05:55:17+5:30
चिंचवड येथील स्थानकावर सरकता जीना (एस्केलेटर) बसविण्यास मंजुरी दिली असून, आकुर्डी येथे देशभरातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू होणार आहे. पुणे-लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे.
पिंपरी : चिंचवड येथील स्थानकावर सरकता जीना (एस्केलेटर) बसविण्यास मंजुरी दिली असून, आकुर्डी येथे देशभरातील रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण करण्यासाठी अतिरिक्त स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू होणार आहे. पुणे-लोणावळा चौपदरी रेल्वेमार्गाच्या कामाला गती दिली आहे.
पुणे-लोणावळा लोकलसाठी स्वतंत्र मार्ग तयार झाल्यानंतर नवीन लोकल गाड्या वाढ करण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई कार्यालयातील सहायक सचिव सु. मु. केळकर यांनी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलमअली भालदार यांना पत्राद्वारे कळविले आहे.
चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने १२ जानेवारी २०१८ ला केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, रेल्वे बोर्ड अध्यक्ष अश्विनी लोहाणी, पुणे येथील विभागीय व्यवस्थापक (मध्य रेल्वे) यांना विविध स्थानकांसंबंधीच्या समस्या, तक्रारींची सविस्तर माहिती पत्राद्वारे देण्यात आली होती.
प्रवासी संघाच्या वतीने केलेल्या लेखी तक्रारी, सूचनांच्या पडताळणीबाबत रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांनी माहिती घेतली. प्रवासी संघाच्या विविध मागण्यांची दखल घेतली.
दापोडी रेल्वे स्थानकावरील, तसेच इतर रेल्वे स्थानकांच्या छतावरील फुटलेले पत्रे, पावसाळ्यात गळणारे छत दुरुस्तीचे प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविले आहेत. कासारवाडी, देहूरोड रेल्वे स्थानकावर प्रवासी महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, यासंबंधी आदेश देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवरील महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात यावेत असेही कळवलेले आहे. कमी व लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांच्या तिकीट आरक्षणासाठी तीन खिडक्या सध्या सुरू आहेत.
- पिंपरी व आकुर्डी येथेही तिकीट आरक्षण खिडकी सुरू व्हावी, अशी मागणी प्रवासी संघाच्या वतीने केली होती. त्यात आकुर्डी येथे पश्चिमेच्या बाजूला तिकीट घर, आरक्षण तिकीट खिडकी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे रावेत, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, प्राधिकरण, निगडी, तळवडे भागातील प्रवाशांना आरक्षणासाठी चिंचवडला येण्याची गरज भासणार नाही. त्यांचा वेळ, पैसा, शारीरिक श्रम वाचणार आहेत.