‘रिंगरोड’साठी सर्वपक्षीय समिती स्थापन; राष्ट्रवादी, शिवसेनेची ठराव रद्दची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 04:17 AM2017-08-20T04:17:36+5:302017-08-20T04:17:40+5:30
रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून रस्ता करू नये. रिंगरोड रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने वळवावा, असा ठराव करून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.
पिंपरी : रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून रस्ता करू नये. रिंगरोड रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने वळवावा, असा ठराव करून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली.
या मुद्यांवर सभागृहात तीन तास चर्चाही झाली. अखेर महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपले मुद्दे मांडणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी पार पडली. या वेळी रिंगरोडच्या मुद्यावर चर्चा झाली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.
वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव येथील रिंगरोडमध्ये बाधित होणारे नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत. या प्रश्नावर महासभेतही चर्चा करण्यात आली.
आयुष्याची पुंजी जमा करून उभे केलेल्या घरावर बुलडोजर फिरू नये. या घरांविषयी सामान्यांच्या मनात मोठ्या भावना आहेत. या प्रकल्पाला आमचा विरोध असून आम्ही सामान्य नागरिकांच्या सोबतच आहोत, असे राहुल कलाटे यांनी नमूद केले.
हा सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या मुद्द्यावर तोडगा निघायला हवा. या रस्त्याऐवजी पर्यायी रस्ता करावा.
- अभिषेक बारणे
या विषयाचे राजकीय भांडवल न करता गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा. यामध्ये कसलेही राजकारण न आणता प्रश्न मार्गी लागायला हवा. रिंगरोड शहरावर आलेले संकट आहे. मानवतेच्या नात्याने सर्वांनी एकत्र यावे. रिंगरोडमध्ये बदल होऊ शकतो. त्यासाठी मानसिकता हवी. रिंगरोड रद्द करण्याचा एक ठराव करून राज्य सरकारकडे पाठवावा. येथे इतक्या वर्षापासून घरे असताना या घरांना लाईट बिले, पाणी बिले येत होती. त्या वेळी प्रशासन झोपले होते का? - भाऊसाहेब भोईर
सामान्य नागरिकांची घरे पडणार असतील तर असा रिंगरोडच नको. ज्या रस्त्यामुळे नागरिक बेघर होणार असतील अशा रस्त्याला आमचा विरोध आहे. - मंगला कदम
भोसरीतील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना रस्ता बदलून जावे लागले ही दुर्दैवी बाब आहे. नागरिकांची दिशाभूल न करता नागरिकांच्या हिताचा निर्णय घ्यावा. दिलेले शब्द पाळणे आवश्यक आहे. - सचिन भोसले