शाश्वत विकासाचा आनंद!
By admin | Published: March 22, 2017 03:03 AM2017-03-22T03:03:53+5:302017-03-22T03:03:53+5:30
अडीच वर्षांत अध्यक्षपदावर काम करीत असताना शाश्वत विकासात भरीव काम केल्याचा सर्वांत जास्त आनंद झाल्याचे जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष
पुणे : अडीच वर्षांत अध्यक्षपदावर काम करीत असताना शाश्वत विकासात भरीव काम केल्याचा सर्वांत जास्त आनंद झाल्याचे जिल्हा परिषदेचे मावळते अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
नवीन अध्यक्षपदाच्या निवडणुकी अगोदर गेल्या टर्ममधील अध्यक्ष दत्तात्रय भरणे व प्रदीप कंद यांच्याशी पत्रकारांनी वार्तालाप केला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, दरवर्षी जिल्हा परिषद शाळांतील घटती पटसंख्या, हे मोठे आव्हान होते. यावर्षी राज्यात एकमेव जिल्हा परिषद अशी आहे, की त्यांचा पट २ हजार ४०७ ने वाढला आहे. दर्जेदार आरोग्य सेवा दिल्याचेही मोठे समाधान आहे. देशात गुजरातमध्ये फक्त पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. मात्र आपल्या २५ केंद्रांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. देशात एकमेव जिल्हा परिषद आहे.
केंद्र व राज्य सरकारद्वारा सध्या स्वच्छ भारत अभियान सुरू आहे. यात आतापर्यंत आपला जिल्हा हा ९८.५२ टक्के शौचालययुक्त झाला आहे. १३ पैैकी ८ तालुके १०० टक्के हगणदरीमुक्त झाले असून पाच तालुके बाकी आहेत. ३१ मार्चअखेर जिल्हा हगणदरीमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पाटबंधारे विभागातर्फे वर्षभरात २४५ कोटींची कामे केली आहेत. यातून जिल्ह्यात १.३६ टीएमसी पाणी साठले असून ३८ हजार एकर क्षेत्र ओलीताखाली आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)