मृत्यूनंतरही तिच्या नशिबी परवडचं होती पण....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 12:29 PM2019-12-17T12:29:21+5:302019-12-17T12:31:46+5:30
बहुतांश वेळा या नात्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. आणि नकळत प्रेमाचा धागा तुटतो. असाच काहीसा प्रकार शहरातील एका दाम्पत्याबाबत झाला.
नारायण बडगुजर
पिंपरी : तीनदा मरणाच्या दारातून परत येत पतीच्या वाटेकडे तिचे डोळे लागले होते. नातेवाइकांना फोन लावूनही तो आला नाही, म्हणून पोलिसांनी संपर्क साधला. त्यानंतर पती काही क्षणांसाठी तिच्यापुढे उभा राहिला आणि मनाची शांतता झाल्यानंतर तिने डोळे कायमचे मिटले. मात्र, त्यानंतरही पतीने आणि त्याच्या नातेवाइकांनी तिच्या मृतदेहाचा स्वीकार केला नाही. माहेरची आर्थिक परिस्थिती हलाखीची. त्यामुळे मावशीने सोनसाखळी व अंगठी गहाण ठेवली. त्या रकमेतून मृत महिलेवर माहेरच्यांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या जवळच्या माणसांकडून प्रेम मिळावे, अशी प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते. त्यात पती-पत्नी म्हणजे एक श्वास, तर दुसरा उच्छ्वास होय. प्रेमाचा धागा पती-पत्नीच्या मनात कोठेतरी असतो. मात्र, बहुतांश वेळा या नात्यात काही कारणांमुळे दुरावा निर्माण होतो. आणि नकळत प्रेमाचा धागा तुटतो. असाच काहीसा प्रकार शहरातील एका दाम्पत्याबाबत झाला.
लग्नाला दहा वर्षे होऊनही मूल होत नाही म्हणून दाम्पत्यामध्ये वादाचे प्रकार वाढले. यातून पत्नीला नांदवायचे नाही म्हणून पतीकडून त्रास सुरू झाला. त्यासाठी नातेवाइकांनी मध्यस्थी केली. बैठक बोलावण्यात आली. मला तुमच्यासोबत राहायचे आहे. मला तुमच्यापासून दूर करू नका, सोडून देऊ नका, मला नांदवा, अशी गयावया पत्नीने केली. मात्र, पती व त्याच्या नातेवाइकांनी काहीएक ऐकून घेतले नाही. पतीकडील नातेवाईक बैठकीतून निघून गेले. त्यांच्यासोबत पतीनेही धूम ठोकली. त्यामुळे पत्नीने त्याचा पाठलाग केला. यात चक्कर येऊन ती पडली. तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचारादरम्यान शुद्ध हरपली. डॉक्टरांचे सर्व उपाय संपले. आई व मावशीचा आक्रोश सुरूच होता. उपचारादरम्यान तीनदा मरणासन्न होऊनही तिचे हृदय धडधडत राहिले ते फक्त तिच्या ‘पती’साठी. तो येईल, आपल्याजवळ बसेल आणि आस्थेवाईकपणे चौकशी करेल, असेच काहीसे भाव तिच्या चेहºयावर होते. त्यामुळे नातेवाइकांनी फोन केला; मात्र तिचा पती प्रतिसाद देईना. अखेर पोलिसांनी संपर्क साधला आणि काही क्षणांसाठी तो पत्नीच्या समोर उभा राहिला. त्यानंतर भाव बदलेला तिचा चेहरा समाधानी असल्यासारखा झाला आणि तिने जगाचा निरोप घेतला.
अंत्यसंस्काराकडे पतीने फिरविली पाठ
सहा दिवस रुग्णालयात पतीची ओढ लागलेल्या पत्नीने मृत्यूशी संघर्ष केला. हयात असताना तिचा स्वीकार करण्यास नकार देणाºया पतीने तिच्या मृत्यूनंतरही तिला स्वीकारले नाही. पती व सासरची मंडळी येऊन मृतदेह ताब्यात घेतील म्हणून माहेरचे दिवसभर ताटकळत बसले होते. मात्र, ते रुग्णालयाकडे फिरकलेच नाहीत. अखेरी माहेरच्यांनी मृतदेह ताब्यात घेतला; मात्र अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. त्यामुळे मृत महिलेच्या मावशी पुढे आली. सोनसाखळी व सोन्याची अंगठी गहाण ठेवली. त्यातून आलेल्या रकमेतून अंत्यसंस्कार केला. मात्र, अंत्यसंस्काराकडेही पतीने पाठ फिरवली. अखेरीस मृत महिलेच्या चुलत्याने अग्नी दिला. त्यानंतर इतर नातेवाइकांनीही शक्य तेवढी आर्थिक मदत केली. त्यामुळे महिलेच्या आईला दिलासा मिळाला. मात्र, मृत्यूनंतरही आपल्या मुलीला पतीचे प्रेम मिळाले नाही, ही खंत व्यक्त करताना तिच्या आईला अश्रू अनावर झाले होते.