मातब्बरांचे स्वप्नं भंगूनही गटासाठी प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: February 17, 2017 04:48 AM2017-02-17T04:48:54+5:302017-02-17T04:48:54+5:30
शहरालगतचा झपाट्याने विकसित होत असलेला नाणे मावळातील कुसगाव-वाकसई जिल्हा परिषद गट जिंकण्यासाठी राजकीय
लोणावळा : शहरालगतचा झपाट्याने विकसित होत असलेला नाणे मावळातील कुसगाव-वाकसई जिल्हा परिषद गट जिंकण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. कुसगाव-वाकसई गट दशकभरापासून राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दत्ता गुंड यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपामध्ये प्रवेश केला असून, या मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलविण्यासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या गटावरील वर्चस्व कायम राखण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली व्यूहरचना आखली आहे. शिवसेनेचेही मतदारसंघात प्राबल्य असून, जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांनी गट ताब्यात घेण्यासाठी मतदारसंघातील सर्वांत जास्त मतदारसंख्या असलेल्या कुसगाव गावामधूनच उमेदवार उभा केला आहे. गट हा अनुसूचित जमाती महिला (एसटी महिला) या प्रवर्गासाठी राखीव झाल्याने मातब्बर मंडळींची स्वप्न भंगली आहेत. असे असले, तरी मतदारसंघ आपल्याच पक्षाच्या ताब्यात राहावा याकरिता सर्वच राजकीय मंडळींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. येथे जिल्हा परिषदेकरिता भाजपाच्या अनिता दिलीप कडू, राष्ट्रवादीच्या कुसुम ज्ञानदेव काशिकर व शिवसेनेच्या सत्यभामा शांताराम गाडे यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.
वाकसई पंचायत समिती गणाचे आरक्षण हे अनुसूचित जमाती (एसटी) या प्रवर्गाकरिता व कुसगाव पंचायत समिती गणाची जागा सर्वसाधारण महिला या प्रवर्गाकरिता राखीव झाल्याने या संपूर्ण मतदारसंघात खुल्या प्रवर्गातील मातब्बर मंडळींचा भ्रमनिरास झाला आहे. मात्र, निवडून येणारे लोकप्रतिनिधी आपल्या विचारांचे असावेत याकरिता या मातब्बर मंडळींनी प्रचाराच्या रणधुमाळीत उडी घेतली असून, निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. वाकसई पंचायत समिती गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे महादू उघडे, भाजपाचे संदीप उंबरे व शिवसेनेचे बाबू शेळके यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे. शिवसेनेच्या आशा देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व यापूर्वी केले होते. कुसगाव गणातील उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर घेतलेले आक्षेप फेटाळून लावण्यात आल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या गणासाठी भाजपाच्या संगीता अनंता गाडे, राष्ट्रवादीच्या राजश्री संतोष राऊत, शिवसेनेच्या उषा संजय घोंगे व नवबहुजन समाज परिवर्तन पार्टीच्या रचना सुरेश घोमोडे यांच्यात चौरंगी सामना रंगणार आहे. मागील काळात राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार हरीष कोकरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.