कारवाई केली, तरी पदपथावरच का दुकान थाटता? पिंपरीतील पथारी व्यावसायिकांचा आडमुठेपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 11:57 AM2021-01-18T11:57:49+5:302021-01-18T11:58:33+5:30

पदपथ सोडून व्यवसाय करा : खटले दाखल केल्यानंतरही अतिक्रमण सुरूच

Even if action is taken, why do you shop on the sidewalk? | कारवाई केली, तरी पदपथावरच का दुकान थाटता? पिंपरीतील पथारी व्यावसायिकांचा आडमुठेपणा

कारवाई केली, तरी पदपथावरच का दुकान थाटता? पिंपरीतील पथारी व्यावसायिकांचा आडमुठेपणा

Next

नारायण बडगुजर- 
पिंपरी : पदपथांवरील अतिक्रमण निमूर्लनासाठी महापालिका, वाहतूक शाखा तसेच स्थानिक पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या कारवाईनंतरही पदपथांवर पुन्हा अनधिकृत विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. ना कारवाईची ना दंडाची भिती, अशी परिस्थिती आहे. कितीही कारवाई करा, आम्ही पदपथांवर अतिक्रमण करणारच, अशा भूमिकेत अनधिकृत विक्रेते असल्याचे दिसून येते.

शहरातील बहुतांश रस्ते तसेच पदपथही प्रशस्त आहेत. मात्र पदपथांवर अनधिकृत विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले आहे. यात हातगाडी, पथारीवाले मोठ्या संख्येने आहेत. या विक्रेत्यांनी पदपथ गिळंकृत केलेले आहेत. परिणामी पादचाऱ्यांना पदपथाऐवजी रस्त्यावरून ये-जा करावी लागते. तसेच या विक्रेत्यांकडून खरेदीसाठी ग्राहक भर रस्त्यात वाहन थांबवितात. तसेच हातगाडीजवळ रस्त्यावर ग्राहकांची मोठी गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होतो. अपघातही होतात. त्यामुळे पदपथांवरील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करून अतिक्रमण निर्मूलन करण्यात यावे, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात होती.

प्रशासनाकडून शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यातील ३३ ठिकाणी पदपथांवर तसेच रस्त्यावर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे समोर आले. त्यामुळे या ३३ ठिकाणी कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार संयुक्त पथकाकडून दंडात्मक कारवाई करून विक्रेत्यांच्या हातगाडी आदी लाखोंचे साहित्य यात जप्त केले असून, पोलिसांकडून खटले दाखल करण्यात येत आहेत.
 

चिंचवड स्टेशन चाैकात ‘जैसे थे’
पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. येथील पदपथावर खाद्यपदार्थांच्या तसेच फळविक्रेत्यांच्या हातगाड्या आहेत. तसेच काही व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानाचे फलक ही पदपथांवर ठेवलेले असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना येथील पदपथाचा वापर करता येत नाही. वाहनांच्या संख्येने येथे रस्ता अरुंद असल्याने वाहनांचा खोळंबा होतो. त्यात अनधिकृत विक्रेत्यांची भर पडून कोंडी होते. त्यामुळे पदपथावरील अतिक्रमण हटविण्यात आले. मात्र त्यानंतरही येथे विक्रेत्यांनी पुन्हा दुकान थाटले आहे.
 

२१३ कारवाई, १५४ खटले दाखल
संयुक्त पथकाने पहिल्या टप्प्यात ५ ते १५ जानेवारी दरम्यान हातगाडी, पथारीवाले, अनधिकृत विक्रेते यांच्यावर कारवाई केली. यात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने २१३ कारवाई केल्या. तर वाहतूक पोलिसांनी १५४ खटले दाखल केले. वाहतुकीस अडथळा केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १०२ अन्वये खटले दाखल करण्यात आले.

येथे झाली कारवाई
चापेकर चौक, रहाटणी फाटा, पिंपरी चाैक, निगडीतील लोकमान्य टिळक चाैक ते भेळ चाैक, वाल्हेकरवाडी चाैक, मोशीतील भारतमाता चाैक,
चाकण येथील माणिक चाैक, दिघी-आळंदी वाहतूक विभागांतर्गत मरकळ चाैक, तापकीर चाैक, कृष्णा चाैक, वाकड येथील उड्डाणपूल, थरमॅक्स चाैक, कृष्णानगर, भोसरीतील पांजरपोळ चाैक, चिखली आदी ठिकाणी रस्त्यावरील तसेच पदपथांवरील विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.
पदपथांवर तसेच रस्त्यांवर विक्रेत्यांनी तसेच इतर कोणीही अतिक्रमण करू नये. त्यांच्यावर यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे. वाहनचालक तसेच नागरिकांनी अशा अनधिकृत विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तू खरेदी करणे टाळावे. जेणेकरून वाहतुकीस अडथळा होणार नाही.
- श्रीकांत डिसले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
-------------------

Web Title: Even if action is taken, why do you shop on the sidewalk?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.