मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही - महादेव जानकर
By विश्वास मोरे | Published: May 8, 2024 07:44 PM2024-05-08T19:44:49+5:302024-05-08T19:45:28+5:30
सर्व पक्षांनी आपली औकात वाढवा, भाजपासारखे संघटनात्मक काम करा, आपोआपच जागा मिळतील
पिंपरी : लोकसभेनंतरही महायुती टिकून राहणार आहे. विधानसभेला ज्याची जिथे ताकद आहे, तसेच जागा वाटप होईल. त्यामुळे घटक पक्षानी सर्व पक्षांनी आपली औकात वाढवा, भाजपासारखे संघटनात्मक काम करा, आपोआपच जागा मिळतील. आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचे. मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे नाही. मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही. मी माझा पक्ष काढला त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार आहे, असे मत माजी मंत्री, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पिंपरी व्यक्त केले. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी जानकर शहरात आले होते.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आयोजित पत्रकार परिषदेत जानकर यांनी भूमिका स्पष्ट केली. महायुतीचे समन्वयक सदाशिव खाडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे, माजी महापौर योगेश बहल उपस्थित होते.
भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक न लढविल्याचा फटका बसणार नाही का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, ''स्वतःच्या पक्षाचा मला अभिमान आहे. कमळ चिन्हाची ऑफर होती. परंतु, दुसऱ्या पक्षाच्या महालापेक्षा माझी झोपडीच बरी आहे. काहीही झाले तरी पक्षाचा अभिमान गहाण टाकणार नाही. २०१४ ला बारामती शहराने माझ्यावर आणखी जरा प्रेम केले असते. तर, पवारांना मी हरवले असते. त्यावेळी मला वेळ कमी मिळाला. चिन्ह ही लोकांपर्यंत पोहचले नव्हते. मला वरिष्ठ नेते म्हणत होते, कमळ चिन्हावर लढा. पण, मी ठरवले होते. आपल्या पक्षाच्या चिन्हावर लढायचे. मला कधीच भाजपच्या कमळ चिन्हावर लढायचे नाही. मेलो तरी चालेल पण धनुष्यबाण, हात आणि कमळावर लढणार नाही. मी माझा पक्ष काढला त्याच चिन्हावर दिल्लीला जाणार आहे.
आपली औकात समजून अपेक्षा व्यक्त कराव्यात
महायुती आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम राहील का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, आपली औकात समजून अपेक्षा व्यक्त कराव्यात, असे नमूद केले. ज्या ठिकाणी भाजपची ताकद आहे. त्या जागांवर त्यांनी हक्क सांगावा. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे, तेथे त्यांनी हक्क सांगावा. पक्षाच्या ताकदीनुसार जागावाटपाचे धोरण ठरावे.'
अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटक पक्ष एकजुटीने लढत असून, राज्यातील महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नसून, देशात नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात गरिबी हटाओचा नारा दिला. प्रत्यक्षात गरिबी हटली नाही. मात्र, गरीब हटले. त्या तुलनेत मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत चांगले काम केले आहे. अपवाद वगळता महागाई नियंत्रित ठेवली आहे. बारामतीमधील शहरी भागात भाजपला मानणारा मोठा मतदार आहे. खडकवासल्यात मला दीड लाखाचे मताधिक्य मिळाले होते. राष्ट्रीय समाज पक्ष, भाजपची राष्ट्रवादी सोबत युती आहे. त्यामुळे खडकवासल्यातून सुनेत्रा पवार यांना जास्त मताधिक्य मिळेल. दौंडमध्ये राहुल कुल आणि रमेश थोरात हे दोघे आमच्यासोबत आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित असल्याचा दावाही त्यांनी केला. विकास करण्यासाठी तिजोरीच्या चाव्या हाती पाहिजेत. विरोधकांना पराभव दिसत असल्याने पैसे वाटपाचे बिनबुडाचे आरोप केले आहेत. कोणी रडल, तरी बारामतीमधून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या पाच हजाराने का होईना निवडून येतील.