इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना

By विश्वास मोरे | Published: June 25, 2024 01:43 PM2024-06-25T13:43:16+5:302024-06-25T13:54:57+5:30

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली ...

Even telling Shinde, Pawar about Indrayani makes no difference, this is unfortunate! Feelings of Niranjannath Maharaj | इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना

इंद्रायणीबाबत शिंदे, पवारांना सांगूनही फरक नाही, हे दुर्दैवच! निरंजननाथ महाराजांच्या भावना

पिंपरी : कार्तिकी यात्रा उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, याबाबत कोणतीही उपाययोजना झालेली नाही, अशी आमची भावना आहे. वारीच्या अनुषंगाने इंद्रायणी प्रदूषणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार या संवेदनशील नेत्यांनी सांगूनही फरक पडत नसेल, तर दुर्दैव आहे, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे, अशी खंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ह. भ. प. निरंजननाथ महाराज यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत निरंजननाथ महाराजांनी अत्यंत तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त केली. महाराज म्हणाले, 'वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त,  जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समवेत जेव्हा बैठका झाल्या. तेव्हा, देहू आणि आळंदीतील इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर, नदीमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत कटाक्षाने प्रकाश टाकला. मात्र, यावर तोडगा निघालेला नाही, ही बाब दुर्दैवी आहे. दाद मागायची कोणाकडे?'

कार्तिकी उत्सवाच्या दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये आम्ही कोणत्या भागातून पाणी सांडपाणी नदीत मिसळते, याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही हालचाल झाली नाही. एवढंच नव्हे तर नदीचे कोणत्या भागामध्ये प्रदूषण होते, याबाबत अत्यंत सूक्ष्म माहिती दिली मात्र, एमपीसीबी आणि जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे घडायचे तेच घडले. तीर्थक्षेत्र विकासाबाबत घोषणा केल्या जातात. मात्र, त्याबाबत प्रत्यक्षात कारवाई कमी होत आहे, अस संताप व्यक्त केला.

याला जबाबदार कोण-

निरंजननाथ महाराज म्हणाले, 'आषाढी-कार्तिकीच्या निमित्ताने वारकरी देहू आळंदीत येतात आणि 'ज्ञानोबा तुकोबा' असे स्मरत इंद्रायणीमध्ये स्नान करतात. जल प्रदूषणाची दूषित पाण्याची डुबकी त्यांना घ्यावी लागते आहे. पुणे जिल्ह्यातून वाहणारी इंद्रायणी आणि त्यापुढे होणारी भीमा थेट चंद्रभागेत जाऊन मिळते. आपल्या भागातील प्रदूषण युक्त पाणी पुढे जाते. वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.'  

आंदोलन करणे उपाय नाही-

नदी प्रदूषणाबाबत दाखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा काहींनी दिला आहे, याबाबत निरंजन महाराज म्हणाले, 'आंदोलन करणे हे फलित असू शकत नाही. यावर तोडगा काढण्याची गरज आहे. वारकऱ्यांना वीस हजार अनुदान देण्याबाबत समिती नेमली जाते. मात्र, नदी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी समिती नेमली नाही. ती तातडीने नियुक्ती करणे गरजेचे आहे. नदी प्रदूषण का कोठे कसे होत आहे, याबाबत अहवाल घेऊन त्यावर तातडीने कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. जीवन देणारी इंद्रायणी नदी प्रदूषणामुळे नदीचे पाणी जीवघेणी ठरू शकते.

त्याचा घाण वास येतो कसा?

मला वाटते, वारकरी संप्रदाय आणि प्रशासनाच्या बैठकांमध्ये केवळ चर्चा होते. मात्र, जलप्रदूषणावर प्रभावी उपाययोजना होत नाही. अधिकारी प्रशासन, गांभीर्याने घेत नाही, ही बाब राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. नदी प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळांने वेगळाच कयास काढलेला आहे. त्यांच्या मते संबंधित पाणी हे साबणाचे आहे, मग जर पाणी हे साबणाचे असेल, तर त्याचा घाण वास येतो कसा? याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. याबाबत राज्य शासन, जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहेत, त्यांनी नदीत इंद्रायणी मातेच्या प्रदूषणाचा विषय तातडीने दूर करण्याची गरज आहे. देहू-आळंदीत येणारे वारकरी श्रद्धेने इंद्रायणीत स्नान करतात. त्यामुळे वारकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याबाबत प्रशासनाने विचार करण्याची गरज आहे,असे निरंजन महाराज म्हणाले.

Web Title: Even telling Shinde, Pawar about Indrayani makes no difference, this is unfortunate! Feelings of Niranjannath Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.