इंद्रायणीनगरमध्ये अखेर होणार मंडई
By admin | Published: December 12, 2015 12:33 AM2015-12-12T00:33:34+5:302015-12-12T00:33:34+5:30
इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता
भोसरी : इंद्रायणीनगर मंडईचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित होते व भूमिपूजन होऊनही कामाला प्रत्यक्षात मुहूर्त लागत नव्हता. निविदाला प्रतिसाद मिळत नसल्याने कामाला ठेकेदार मिळत नव्हता. मात्र, एकदाचा मंडईच्या कामाला प्राधिकरणाला ठेकेदार मिळाला असून, येत्या १५ दिवसांत प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.
इंद्रायणीनगरचा सर्व भाग पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येतो. त्यामुळे येथील सर्व कामे प्राधिकरणाकडून करून घ्यावी लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात मंडई व्हावी, यासाठी नागरिकांची मागणी होती. माजी आमदार विलास लांडे यांनी यासाठी पुढाकार घेऊन मंडईचा मार्ग मार्गी लावला होता. इंद्रायणीनगरमध्ये भाजी मंडईच नसल्याने भाजी व फळविक्रेते रस्त्यावर व्यवसाय करत होते. भाजी व फळविक्रेते यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. तसेच येथील नगरसेवक व नागरिकांची मागणीही वाढत होती. त्यामुळे प्राधिकरणाने येथील पेठ क्रमांक दोनमध्ये दोन हजार तीनशे चौरस मीटर जागेत ७२ भाजी विक्रेते व १३ फळविक्रेत्यांसाठी गाळ्यांचे नियोजन करून कामास मंजुरी देण्यात आली होती. यासाठी प्राधिकरणाने दोन कोटी तेरा लाख छपन्न हजार रुपयांची अंदाजपत्रकात तरतूदही केली होती. दीड वर्षापूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, महापौर मोहिनी लांडे, विभागीय आयुक्त विकास देशमुख, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, नगरसेवक संजय वाबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मात्र, अजूनही कामाचा पत्ताच नाही. काम होणार नव्हते, तर भूमिपूजन कशाला केले, अशा तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधून येत होत्या. या कामासाठी ठेकेदार मिळत नसल्याची चर्चा वारंवार होत होती. निविदा प्रक्रिया राबवूनही ठेकेदार मिळत नव्हता. या कामासाठी एकदाचा ठेकेदार मिळाला असून, संकल्प कन्स्ट्रक्शन यांना हे काम मिळाले आहे. २ कोटी २ लाख ८८ हजार एवढी रक्कम खर्चून प्राधिकरण बझार इंद्रायणीनगरमध्ये होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, येत्या १५ दिवसांत काम सुरू होणार असल्याची माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. (वार्ताहर)